

सोमनाथ मैड
सावेडी: जागतिक घडामोडी, फेडरल बँकेकडून व्याजदर वाढवण्याची शक्यता, अमेरिकेत काँग्रेस मध्यवधी अगामी निवडणुकांचा परिणाम सराफ बाजारावर झाला. सोन्याच्या दरात ४ हजार, तर चांदीत १५ हजार रुपयांनी घट झाली शनिवारी (दि.२४) अहिल्यानगरच्या सराफ बाजारात सोने १ लाख ४३ हजार २०० रुपये तोळा, तर चांदी १ लाख ९५ हजार रुपये प्रति किलो (जीएसटी सह ) प्रमाणे खरेदी विक्रीचे व्यवहार झाले.
अमेरिकेतील मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिजर्व बँकेकडून २७ आणि २८ ऑक्टोबरला व्याजदर वाढवण्याची शक्यता आहे. व्याजदर वाढल्यास किंवा उच्च पातळीवर ठेवले, तर बॉण्ड यील्ड आणि अमेरिकन डॉलर मजबूत होतात. सोने हे कोणतेही व्याज किंवा उत्पन्न देत नाही.
त्यामुळे लोक सोन्या ऐवजी बँकेत किंवा सरकारी बॉण्ड मध्ये पैसे गुंतवणे पसंत करतात . तसेच पुढील महिन्यात 3 नोव्हेंबरला अमेरिकेमध्ये काँग्रेसच्या मध्यवर्ती निवडणुका होण्याचे संकेत आहेत. त्या अनुषंगाने सोने चांदीच्या दरात घट होत असल्याचे मत सराफ बाजारातील तज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.
नगर सराफ बाजारात शुक्रवारी (दि.२३) सकाळी सोने एक लाख ४७ हजार पाचशे रुपये तोळा प्रमाणे तर चांदी दोन लाख १० हजार रुपये प्रति किलो प्रमाणे खरेदी विक्रीचे व्यहार झाले. शनिवारी अचानक सोन्याच्या भावात ४ हजार रुपये तर चांदीच्या दारात १५ हजार रुपयांनी घट झाली. त्यामुळे ग्राहकांना सोने दागिने खरेदी फायद्याची शक्यता अर्थतज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली.
जागतिक परिस्थितीत सोन्याचे भाव कोसळतात, त्यावेळी काही दिवसातच सोन्याचे भाव वाढल्याचे दिसून येते. दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव वाढू शकतात. सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही एक मोठी संधी आहे.
अनिल पोखरर्णा, संचालक, पोखरर्णा ज्वेलर्स, नगर
या वर्षात सोने चांदी दरात मोठी चढउतार झाली आहे. मात्र दिवाळीनंतर असलेल्या लग्नसराईसाठी वधू-वर पक्षांना लग्न सोहळ्यासाठी दागिने खरेदी करताना सोन्याचे दर कमी झाल्याने आर्थिक फायदा होणार आहे.
विशाल बुऱ्हाडे, संचालक एस. व्ही. बुऱ्हाडे, सराफ सावेडी, नगर