

मिरी/करंजी: रूंदी अवघी तीन फूट अन् खोली ५० फूट.. विहिरीत साक्षात मृत्यू समोर दिसत होता. खिशात मोबाईल पण तोही बंद पडला. आता काही खरे नाही, असे म्हणत त्यांनी देवाचा धावा सुरू केला. किर्रर अंधारात जीव मुठीत धरून दोन दिवस काढले. अचानक खिशातील मोबाईल सुरू झाला अन् कुटुंबियांशी संपर्क साधत ठावठिकाणा सांगितला. मग कुटुंबियासह अख्खं गावच मदतीला धावलं अन् दोन दिवसांनी विहिरीच्या बाहेर सुखरूप निघाले.एखाद्या चित्रपटाला शोभावी, अशी ही घटना मिरी (पाथर्डी) येथे घडली.
गोरख हनुमंत धनवटे असे विहिरीतून सुखरूप बाहेर आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पाथर्डी तालुक्यातील मिरी गावचे ते रहिवासी. घरातील चुलीसाठी सरपण शोधत ते शेजारच्या पडक्या वाड्यात पोहचले. झाडं झुडपं अन् गवतात विहिर पूर्णपणे झाकलेली असल्याने त्यांना तिचा अंदाजच आला नाही. सरपण काढण्याच्या नादात ते काही कळण्याच्या आत ते विहिरीत कोसळले. घसा कोरडा पडेपर्यंत मदतीसाठी आरडओरड केला, पण बाहेर तो ऐकण्यासाठी कोणीच नव्हते. घरही त्यापासून दूर. त्यामुळे कोणी मदतीला पोहचेल, याची आशा मावळली.
खिशात मोबाईल पण तोही बंद पडला. आता कोणी मदतीला येईल, याची शाश्वतीच राहिली नाही. काळोख्या रात्री अन् दिवसाही आवतीभोवती अंधार. मृत्यू साक्षात पुढ्यात असल्याचे चित्र, मात्र त्याही अवस्थेत तग धरून त्यांनी देवाचा धावा सुरू केला. इकडे वडिल घरी न आल्याने मुले, पुतण्यांनी शोधाशोध केली. नेहमीचा वावर असलेली ठिकाणावर शोध घेतला, नातेवाईकांकडे चौकशी केली. इतकंच काय तर आसपासच्या गावातही धुंडाळले. सोशल मिडियाचा आधार घेत शोधशोध केली, पण सगळं फेल गेलं. अखेर पोलिस ठाण्यात धाव घेत गोरख धनवटे बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.
इकडे कुटुंबाची चिंता वाढली अन् तिकडे गोरख संपर्कासाठी धडपडत होते. दोन दिवस विहिरीत राहून काढल्यानंतर अचानक खिशातील मोबाईल सुरू झाल्याचे निदर्शनास आले. मोबाईल सुरू झाल्याचे दिसताच गोरख यांच्या आशा पल्लवीत झाल्या. कुटुंबाशी संपर्क साधत ‘घराजवळील विहिरीत असल्याची माहिती कळवली’. बेपत्ता वडिलांची आवाज ऐकून मुलं पळतच विहिरीच्या शोधात धावली. आसपासच्या विहिरी शोधल्या, पण गवतात झाकलेली वाड्यातील ती विहिर काही दिसेना. अखेर ती अरूंद विहिर शोध मोहिमेदरम्यान दिसली. बॅटरीचा उजेड लावून डोकवले असता आतमध्ये गोरख असल्याचे दिसले. कुटुंबियांशी गोरखचा संवाद झाला. मग मदतीसाठी अवघं गाव धावलं. विहिरीत दोरखंड सोडला, पण चढाइर् कठिण... एका तरूणाने धाडस दाखवलं अन् तो त्या अरूंद विहिरीत उतरला. मोठ्या महतप्रयासाने गोरख यांना सुखरूप बाहेर काढले अन् उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला. वडिलांना पाहताच कुटुंबियांचे डोळे आनंदाश्रूने डबडबले.
हातपाय जखडले
अवघ्या तीन फूट रुंद विहिरीत दोन दिवस काढल्याने गोरख यांचे पाय जखडले गेले. विहिरीत कोसळताना हाताला खरचटले. प्रकृती स्थिर असली तरी त्यांचे हातपाय जखडल्याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पण दैव बलवत्तर
विहिरीत पडलेल्या गोरख यांच्या खिशात मोबाईल होता, पण नेटवर्क गायब झाले होते. विहिरीत असताना अंगावरून दोन वेळेस साप गेला. पण दैव बलवत्तर त्याने दंश केला नाही. दोन दिवसांनंतर अचानक मोबाईलला रेंज आली अन् तो सुरू झाला. सुदैवाने विहिरीत पाणी नव्हते अन् पावसानेही गुंगारा दिला होता. केवळ दैव बलवत्तर म्हणून गोरख धनवटे दोन दिवसांनंतरही सुखरूप बाहेर पडले.