

नगर: जिल्हा बँकेच्या सोसायटी मतदार संघातील १४ जागांसाठी ज्या प्रमाणे फिल्डींग सुरू झाली, त्याच पद्धतीने उवर्रीत सात जागांसाठीही चुरस रंगली आहे. सत्तेचे समिकरण मांडताना या सात जागांनाही तितकेच महत्व आले आहे. बिनविरोध ठरल्यास कोणाची राजकीय ‘सोय’ केली जाणार, अन् निवडणूक लढवण्याची वेळ आली तर उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात बांधली जाणार, याची उत्कंठा असणार आहे.
सोसायटी मतदार संघातून प्रत्येक तालुक्यात अनेक इच्छुक आहेत. सोसायटीच्या १४ जागा बिनविरोध करायच्या झाल्यास अनेकांनी मनधरणी करावी लागणार आहे. कोणी ऐकलेच नाही, हट्टच धरला तर त्यासाठी शेतीपूरक, बिगरशेती पर्याय ओपन करण्याची चिन्हे आहेत. मात्र या मतदारसंघातही अगोदरच दिग्गजांची रेस आहे. नाराजांचे पुनर्वसन अवघड दिसत असले तरी ओबीसी, दोन महिला अशा तीन जागांवर ‘पर्याय’ खुले असल्याचे दिसते.
बिगरशेतीमध्ये जगताप-गायकवाड टफ फाईट!
बिगरशेती मतदार संघातून एक जागा निवडून दिली जाते. पतसंस्था फेडरेशन तसेच मजूर फेडरेशनवर पकड असलेले प्रशांत सबाजीराव गायकवाड यांची उमेदवारी अंतिम समजली जात आहे. त्यांना सुनेत्रा पवार यांनी तयारीला लागण्याचा शब्द दिलेला आहे. आमदार काशीनाथ दाते यांनीच स्वतः त्यांचे नाव सुचवले आहे. मात्र, त्याचवेळी आ. संग्राम जगताप यांचे बंधू सचिन अरूणकाका जगताप यांच्याही नावाची जोरदार चर्चा आहे. विधानपरिषदेप्रमाणेच बँकेतही सचिन जगताप यांची मनधरणी करण्यात यश आले तरच गायकवाड यांचा मार्ग सुकर होऊ शकतो. मात्र, बंडखोरी किंवा नाराजी दूर करताना प्रसंगी मालपाणी, काळे-कोल्हे, घुले किंवा सुवर्णा संदीप कोतकर अशीही नावे पुढे येऊ शकतात, असे राजकीय जाणकरांचे म्हणणे आहे.
शेतीपूरक की महिला; काळे-कोल्हेंचा निर्णय काय?
शेतीपूरक मतदार संघातून एक संचालक निवडणूक दिला जाणार आहे. ही जागा ॲडजेस्टमेंटनुसार वाट्याला येणार आहे. गेल्यावेळी ती कोपरगावला होती, आशुतोष काळे या गटातून संचालक झाले होते. यावेळीही कोपरगावातून काळे-कोल्हे यांच्यापैकी सोसायटीतून अन् शेतीपूरकमधून नेमक कोण, हे अगोदर ठरवावे लागणार आहे. जर शेतीपूरकची जागा तडजोडीत श्रीगोंदा, संगमनेर किंवा अन्यत्र गेल्यास चैताली काळे- स्नेहलता कोल्हेंपैकी एक ‘महिला’ संचालिका बँकेत दिसू शकतात.
ओबीसीतून ससाणे की नवा चेहरा?
श्रीरामपुरातून भानुदास मुरकुटे सोसायटीतून लढणारच हे नक्की आहे. मात्र गेल्यावेळी बाळासाहेब थोरात यांनी करण जयंतराव ससाणे यांना ओबीसीतून संधी दिली होती, मात्र यावेळी विखे पाटील देखील विरोधी गटातील विशेषतः काँग्रेसच्या ससाणेंना संधी देतील, की त्या जागेवर आपल्या स्थानिक कार्यकर्त्याचे पुनवर्सन करतील, याविषयी शंका आहे. ससाणे यांना डावलल्यास मूळ ओबीसींची नाराजी ओढावू शकते. मात्र, जागा वाटपात ही जागा अन्य तालुक्याच्या वाट्याला जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. असे झाल्यास श्रीरामपुरला एकच संचालक दिसेल.
भांगरे, पिचड, लहामटेंचा पेच कसा सुटणार?
गतवेळी अनूसूचित जाती जमातीतून अमित भांगरे यांना संधी देण्यामागे, वैभव पिचडांना टाळणे हाच हेतू असल्याचे लपून राहिलेले नव्हते. यावेळीही वैभव पिचड आणि आमदार किरण लहामटे या दोघांना बाजुला ठेवण्यासाठी अमित भांगरे यांनाच पुन्हा संधी देण्याची खेळी केली जाईल का, याकडे लक्ष आहे. पिचड डावलणार असल्यास लहामटेनाही भांगरेची अडचण असणार नाही. तसेच, सोसायटी मतदार संघात यंदा सीताराम गायकर स्पर्धेत नसल्याने कदाचित पिचडांची तिथे व्यवस्था केली जाईल, असेही वाटत होते. मात्र गायकर शेवटच्या क्षणी पुन्हा स्वतःचा ठराव करून पिचडांना यावेळीही बँकेतून बाहेर ठेवण्यासाठीच रेसमध्ये आलेत की काय? अशी चर्चा आहे.
दोन महिला संचालिका कोण?
पाथर्डी सोसायटी मतदार संघातून मोनिका राजळे यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. तर दोन महिला राखीव मतदार संघातून अनुराधा नागवडे, प्रणोती जगताप की प्रतीभा पाचपुते, याशिवाय स्नेहलता कोल्हे, चैताली काळे, रत्नामाला लंघे, सुवर्णा कोतकर, विजयालक्ष्मी फाळके अशीही नावे चर्चेत आहेत. ज्या तालुक्यात विशेषतः कोपरगाव, श्रीगोंदा, पारनेर किंवा प्रसंगी अन्य तालुक्यातील नवीन महिलांनाही संधी मिळू शकते, असे समजते.
भटक्या विमुक्तची जागा संगमनेरातच?
गेल्या काही पंचवार्षिकपासून भटक्या विमुक्तची जागा संगमनेरात आहेत. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे निकटवर्तीय समजले जाणारे गणपतराव सांगळे हे सलग दोन टर्म संचालक राहिलेले आहेत. त्यांना राखीव जागेतून पुन्हा संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. मात्र, जागांची अदलाबदल झालीच, तर संगमनेरात शेतीपूरक किंवा महिला राखीव जागा जाऊ शकते, असेही बोलले जाते.