

गोरक्ष शेजूळ
नगर: महाराष्ट्रातील दुग्धोत्पादनात पहिल्या क्रमांकावर असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यात खासगी व सहकारी संस्थांच्या माध्यमातून दररोज सरासरी ४८.३२ लाख लिटर दूध संकलन होत आहे. गेल्या वर्षी मे २०२५ मध्ये ४४ लाख लिटर दुधाचे संकलन होते. यामध्ये ठोक, पिशवीबंद आणि उपपदार्थांसाठी वापरल्या जाणाऱ्या दुधाची आकडेवारी पाहिल्यास भेसळीच्या संशयाला खतपाणी मिळत असल्याचे बोलले जाते आहे.
जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग व जिल्हा दुग्धविकास विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात सुमारे ९३६ सहकारी व खासगी दूध संस्था कार्यरत असून, यापैकी साधारणतः 153 संस्था गावपातळीवर दूध संकलनाचे काम करतात. याशिवाय ९५ छोटे-मोठे चिलिंग प्लांट्स आणि दूध संकलन केंद्रांच्या माध्यमातून हे दूध संकलन केले जाते. साधारणतः सात लाख गायी आणि म्हशींचे हे दूध आहे.
खासगी संघांचे वर्चस्व
मे २०२६ मधील आकडेवारीनुसार सहकारी दूध संघांकडून ६ लाख २६ हजार लिटर, खासगी दूध संघ व डेअरींकडून तब्बल ३५ लाख ७५ हजार लिटर असे फक्त जिल्ह्यातून 42 लाख लिटर, तर जिल्ह्याबाहेरून बीड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे इत्यादी जिल्ह्यांतून दररोज ६ लाख ३१ हजार लिटर दूध येथे आणले जाते; अर्थात बाहेरून येणाऱ्या दुधाबाबत अनेकदा शंका व्यक्त केली गेली आहे. एकूणच जिल्ह्यात दररोज 48 लाख लिटर दूध उपलब्ध होताना दिसते.
जिल्ह्यात दूध भेसळीची चर्चा लपून नाही. अनेक सेंटर चालकांपासून ते बड्या प्लॅन्टपर्यंत हे धागेदोरे असल्याचेही सांगितले जाते. आता गेल्या वर्षीचीच आकडेवारी पाहिली तर गतवर्षीपेक्षा या वर्षी चार लाख लिटर दूध वाढले आहे. जनावरांची संख्या मात्र सरासरी तितकीच आहे. मग वाढलेले दूध हे भेसळीचे आहे, की खरोखरच उत्पादन वाढले आहे, याविषयीचे प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे वाढलेले दूध हे ठोक विक्री अन् पिशवीतूनच जास्त विकले जात असल्याचेही समोर आले आहे.
डेअरी विभागाच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात गेल्या वर्षी मे 2025 मध्ये 44 लाख लिटर दुधाचे संकलन होते. यामध्ये सहकारी 6.12, खासगी 32.38 तर जिल्ह्याबाहेरून 5.53 लाख लिटर दुधाचा समावेश होता. आता मे 2026 शी याची तुलना केली तर, आज दररोज 48.32 लाख लिटर दूध जिल्ह्यात येते. म्हणजे गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी दररोज चार लाख लिटर दूध संकलन वाढले आहे. यामध्ये सहकारी दूध संकलन 6.26 आहे, ते 14 हजार लिटर वाढले. खासगी 35.75 लाख लिटर आहे, ते तीन लाख लिटरने वाढले. जिल्ह्याबाहेरूनही यावर्षी एक लाख लिटर संकलन वाढल्याचे चित्र आहे. अशाप्रकारे चार लाख लिटर दूध वाढल्याचे दिसते.
दररोजचे दूध जाते कुठे?
संकलित दुधाचा मोठा हिस्सा विविध दुग्धजन्य पदार्थ निर्मितीसाठी वापरला जातो. दररोज 4 लाख 79 हजार लिटर दुधापासून तूप, खवा, श्रीखंड, पनीर, दही यांसारखे पदार्थ तयार केले जातात. तसेच सुमारे 26 लाख लिटर दूध हे दूध पावडर व इतर वापरासाठी ठोक विक्री केले जाते. 10 लाख लिटर दूध प्रक्रिया उद्योगांमध्ये चीज, बटर इत्यादी उत्पादनांसाठी वापरले जाते. याशिवाय 5 लाख 53 हजार लिटर दूध पिशवीबंद करून मुंबई, पुणे, नाशिकसह इतर शहरांमध्ये विक्रीसाठी पाठवले जाते.
उपपदार्थांचे गौडबंगाल काय
अनेक प्लॅन्ट उपपदार्थ बनवितात, मात्र त्याचा दर्जा चर्चेचा विषय राहिला आहे. ज्यांच्याकडे जनावरेच नाहीत, ते पनीरचा पुरवठा करत असल्याचे राहुरीसारख्या ठिकाणाहून समोर येते. ज्या पाथर्डीत दुग्ध उत्पादन कमी आहे, त्या परिसरातून सर्वात जास्त खवा विक्री केला जातो, याशिवाय छोट्या-मोठ्या प्लॅन्टमधूनही पनीर, पेढे, तूप हे ‘शुद्धता’ भासवून विक्री केले जाते. नगर शहरात तर मिठाईमध्ये किती टक्के भेसळ आहे, यावर प्रचंड साशंकता व्यक्त केली जात आहे.
नेमकी दुधाला मागणी कशी?
एकीकडे लोकसंख्या वाढती आहे. मात्र पशुधनाची संख्या थोड्याफार फरकाने तशीच आहे. अशाही परिस्थितीत मुबलक दुधाचा पुरवठा येतो कुठून, हा प्रश्न आहेच. जिल्ह्यात गेल्या वर्षीपेक्षा वाढीव चार लाख लिटरपैकी यंदा दररोज 2 लाख लिटर अधिकचे दूध हे ठोक विक्रीने जात आहे. पिशवीबंद दुधालाही वाढती मागणी असून, यामध्येही 2 लाख 06 हजार लिटरने वाढ झालेली आहे. तसेच दुग्धजन्य पदार्थनिर्मितीसाठीही तब्बल 3.37 लाख लिटरने वाढ झाल्याचे पुढे आले आहे.
जिल्ह्यातून 42 लाख लिटर दूध संकलन केले जाते. याशिवाय बाहेरूनही सहा ते सात लाख लिटर दूध येते. बहुतांश दूध ठोक विक्री केले जाते. यातून पावडर, खवा, पनीर, श्रीखंड, दही इत्यादी उपपदार्थाची निर्मिती केली जाते. नगरच्या दुधाचा दर्जा उत्तम, विश्वासास पात्र असल्याने बाहेरूनही चांगली मागणी आहे. भेसळीचे प्रमाण अगदी एक ते दोन टक्के असून, त्यांचे असोसिएशन कधीही समर्थन करत नाहीत.
दीपक लांडगे, अध्यक्ष, प्रियदर्शनी दूध उद्योग समूह