

पोहेगाव: राज्यात शाळेच्या पहिल्या दिवशी जल्लोष सुरू असताना कोपरगाव तालुक्यातील टोकाचे गाव असलेल्या मनेगाव येथे मात्र ग्रामस्थांनी शाळा बंद ठेवली. इयत्ता सातवीपर्यंतच्या सात वर्गांना केवळ तीनच शिक्षक असल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा निर्णय घेतला. सहावी व सातवीच्या भाषा व विज्ञान विषयांसाठी पूर्णवेळ शिक्षक मिळेपर्यंत आणि एका वादग्रस्त शिक्षकाची बदली होईपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय तातडीच्या ग्रामसभेत घेण्यात आला.
सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात राज्यभरात शिक्षकांच्या बदल्या झाल्या. त्यात मनेगाव जिल्हा परिषद शाळेतील चार शिक्षक बदलून गेले. त्यात सहावी व सातवी वर्गात भाषा व विज्ञान विषय शिकविणाऱ्या शिक्षकांचा समावेश आहे. कित्येक दिवस मुलांना शिकवण्यासाठी शिक्षकच नाहीत. सर्व वर्गांचा भार तीन शिक्षकांवर टाकण्यात आला. गावाने त्या वेळीदेखील शाळा बंद ठेवली होती. त्यानंतर प्रशासनाने तात्पुरते दोन शिक्षक देऊन ग्रामस्थांनी समजूत काढली व पुन्हा शाळा सुरू केली. नंतर या दोन्ही शिक्षकांची बदली करण्यात आली.
या वर्षी शाळा सुरू होताच तीनच शिक्षक शाळेवर दिसल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. त्यांनी यावर प्रशासक व ग्रामसेवकांकडे तातडीची ग्रामसभा घेण्याची मागणी केली. इयत्ता चौथीत गेलेल्या अनेक मुलांना लिहिता-वाचता येत नसल्याचे पालकांनी निदर्शनास आणून दिले.
तातडीच्या ग्रामसभेत प्रभारी गटशिक्षण अधिकारी यांच्यावरदेखील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. अनेक वर्षे झाली तरी तालुक्याला पूर्णवेळ गटशिक्षण अधिकारी का मिळत नाही, असा प्रश्नदेखील या वेळी उपस्थित करण्यात आला.
पालकांच्या या पवित्र्यानंतर पंचायत समिती स्तरावरून केंद्रप्रमुखांना ग्रामस्थांशी चर्चा करण्यास पाठविण्यात आले. मात्र त्यांनादेखील ग्रामस्थांच्या रोषाचा सामना करावा लागला. पालकांनी शिक्षक नसल्यामुळे होणाऱ्या नुकसानीच्या तक्रारींचा पाढा वाचला आणि शिक्षक मिळेपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला.