

संगमनेर /आश्वी: मांडवे बुद्रुक येथे रक्ताच्या थारोळ्यात आढळलेल्या मृत इसमाच्या खुनाचे रहस्य उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे. संबंधित मृत व्यक्तीचा खून हा त्याच्या प्रेयसीनेच केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. सोबत राहण्यास नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीने त्याची हत्या केल्याचे समोर आले. (Latest Ahilyanagar News)
दि. 12 ऑक्टोबर रोजी शिवप्रभा ट्रस्ट, मांडवे बुद्रुक (संगमनेर) येथे एक पुरुष जातीचे प्रेत रक्ताचे थारोळ्यात सापडले. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, सहायक पोलिस निरीक्षक हेमंत थोरात, उपनिरीक्षक अजय कौटे, आदिनाथ गांधले, दत्तु चौधरी, सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, महादेव हांडे, अमृता नेहरकर आदींनी तपास करून हा मृतदेह भाऊसाहेब विठ्ठळ बाचकर रा. जांभुळबन, ता. राहुरी, यांचे असल्याचे निष्पन्न केले.
दरम्यान, पोलिसांनी भाऊसाहेब बाचकर यांची पत्नी व नातेवाईक यांचेकडे विचारपुस केली. त्यात, भाऊसाहेब बाचकर व जयश्री नावाच्या महिलेमध्ये मागील तीन वर्षांपासुन प्रेमाचे संबंध होते. दोघेही अहिल्यानगर येथे राहत असल्याची माहिती समजली. तसेच दि.11 रोजी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास भाऊसाहेब बाचकर हे पत्नी व मुलाबांळांना भेटण्यासाठी साकुर येथे आले होते. तेव्हा त्याचेसोबत जयश्री ही देखील होती.
भाऊसाहेब याने पत्नी योगिता हिस साकुर येथे बोलावुन, मला आता जयश्री सोबत रहायचे नाही, यापुढे तुझ्या सोबत राहणार आहे, असे सांगितले. त्याने जयश्रीला देखील तसे सांगितले. मात्र तिला याचा राग आला. तुम्हाला माझ्या सोबत रहावे लागेल नाहीतर मी तुम्हाला जिवे ठार मारीन, अशी जयश्रीने धमकी दिली. त्यानंतर भाऊसाहेब यास जयश्री हि मोटारसायकल वरुन घेवुन शिवप्रभा ट्रस्ट, मांडवे बुद्रुक येथे गेली. त्या ठिकाणी टणक वस्तू डोक्यात मारून भाऊसाहेब याचा खून केला व त्याचा मोबाईल घेऊन पलायन केलयाचे तपासात समोर आले.
उपनिरीक्षक अजय कौटे, पो.कॉ सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर व अमृता नेहरकर यांनी प्रवरासंगम येथे सापळा लावून जयश्रीला ताब्यात घेतले. दरम्यान, एकत्र राहण्यास नकार दिल्याने आपणच भाऊसाहेब याच्या डाोक्यात टणक वस्तू मारल्याचे जयश्री चव्हाण (मूळ रा. संभाजीनगर) हिने कबुल केले.