

सोमनाथ मैड
सावेडी: अधिक मासात अर्थात धोंड्य़ाचा महिना लेक-जावयाला सोने-चांदीचे दागिने तसेच महिलांकडून जोडव्यांत भर घालण्याच्या परंपरेमुळे अहिल्यानगरच्या सराफ बजारात सुमारे 25 कोटींची उलाढाल झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
हिंदू संस्कृतीत अधिक मासाचे विशेष महत्त्व आहे. दर तीन वर्षांनी अधिक मास (धोंड्याचा महिना) येतो. आख्यायिकेनुसार हा महिना भगवान विष्णूचा महिना मानला जातो. जावयाला विष्णूचे तर मुलीला लक्ष्मीचे रूप मानले जाते. त्यामुळे सासरकडून जावई व लेकीला सोन्याची अंगठी, चांदीचे ताट, वाटी, चमचा, निरंजन, कपडे देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला जातो. तसेच 33 अनारसे आणि धोंड्याचे वाण दिले जाते. त्याचप्रमाणे मुलीला चांदीची पैंजण, जोडवी, दिली जाते.
या महिन्यात सोने- चांदीच्या खरेदीत मोठी वाढ होत असल्याने सराफ व्यावसायिक जोडवी, चांदीचे पैजन, चांदीचे ताट, ग्लास, निरंजन उपलब्ध करून ठेवतात. या महिन्यात सोने-चांदीच्या भावात मोठे चढउतार होत असले तरी सुवर्णकारांच्या हाताला काम मिळून मोठा रोजगार निर्माण होतो. त्यासाठी सुवर्णकार या महिन्याची विशेष वाट पाहत असतात. या महिनाभरात सराफ बाजारात सुमारे एक हजार किलो चांदीची उलाढाल झाल्याचे सराफ व्यावसायकांकडून सांगितले जात आहे.
दर तीन वर्षांनी अधिक मास
सौर वर्ष 365 दिवसांचे आणि चांद्र वर्ष 54 दिवसाचे असते. या दोन्हींमध्ये दरवर्षी सुमारे 11 दिवसांचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी दर तीन वर्षांनी सुमारे 33 दिवसांचा अतिरिक्त महिना येतो. त्याला अधिक मास (धोंड्याचा महिना) संबोधले जाते. या काळात दानधर्म, जावायला 30+3 अनारसे, कपडे, सोने-चांदी दान दिले जाते.
सोन्या-चांदीच्या दरात चढउतार
अधिक मासात सोने प्रति तोळा 4 हजार रुपये आणि चांदी प्रति किलो 20 हजार रुपयांनी घसरली. या वर्षी आदिक मास 17 मे ते 15 जून या कालावधीत होता. त्यासाठी सराफ व्यावसायिकांनी चांदीच्या दागिन्यांचा स्टारकास्ट तयार करून ठेवला. मात्र सुरुवातीला सोने एक लाख 52 हजार रुपये प्रति तोळा, तर चांदी 2 लाख 70 हजार रुपये किलो असे दर होते. परंतु धोंड्याच्या महिन्यात सोन्याचे दर चार हजारांनी, तर चांदी 20 हजार रुपये घसरली. त्यामुळे महिनाअखेरपर्यंत सोने आणि चांदीच्या खरेदी- विक्रीतून सराफ बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल झाली.
महिलांच्या चांदीच्या दागिन्यासोबत पुरुषांसाठीही चांदीच्या दागिन्यांची मागणी वाढली आहे. चांदीची चैन, ब्रासलेट, अंगठी आदींच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. तसेच औद्योगिक क्षेत्रात, विशेषत: सोलर, मोबाईल, लॅपटॉप यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर वापर होत असल्याने चांदीच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
किरण आळंदीकर, अध्यक्ष, इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (प. महाराष्ट्र)