

खरवंडी कासार: नवीन शैक्षणिक वर्ष १५पासून सुरू झाले. सर्वत्र नवागतांचे स्वागत गुलाबपुष्प, ढोल-ताशांचा गजर, सेल्फी पॉइंट, शाळांच्या प्रवेशद्वाराला फुग्यांची कमान, नवीन पुस्तके, शूज, शालेय साहित्य देऊन उत्साहपूर्ण वातावरण करण्यात आले. मात्र, मौजे एकनाथवाडी येथील जांभूळवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला एका शेतकऱ्याने चक्क कुलूप लावल्याने शाळा भरलीच नाही.
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गट नं. ५३७ मधील जि. प. शाळा जांभूळवाडी २०००मध्ये स्थापन झाली. शाळेच्या इमारतीसाठी दिलेल्या जागेचा मोबदला आज २५ वर्षे झाली, तरी शेतकऱ्यास मिळालेला नाही. यापूर्वी मोबदल्यासाठी ३ दिवस उपोषण केल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी गायगोठा व विहीर मंजूर करतो, असे लेखी आश्वासन दिले होते. परंतु आजपर्यंत कोणत्याही योजनेचा मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्याने नाराजी व्यक्त करत शाळेला कुलूप लावले.
विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात
या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पालकांमध्येही तीव्र नाराजी आहे. स्थानिक प्रशासन, गटशिक्षण अधिकारी, गटविकास अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन वस्तुस्थितीची चौकशी करावी. शेतकऱ्याचा मोबदल्याचा प्रश्न आणि विद्यार्थ्यांचे शिक्षण या दोन्ही बाबींवर त्वरित तोडगा काढावा, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने व जबाबदारीने कार्यवाही करणे गरजेचे आहे. अन्यथा शाळा सुरू होईपर्यंत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
अंगणवाडी भरतीचा मुद्दाही ऐरणीवर
एकनाथवाडी येथील अंगणवाडी मदतनीस पदभरतीतही राजकीय हस्तक्षेप करून नियम डावलले गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अपंग महिलेकडे आरक्षणासाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले असून, तक्रार अर्ज देऊनही प्रशासनाने दखल घेतली नाही. अर्जदार सुदाम नामदेव खेडकर यांच्या सून भाग्यश्री खेडकर ह्या अपंग असूनही त्यांना संधी नाकारण्यात आली. एकनाथवाडी गावात शाळेचा मोबदला आणि अंगणवाडी भरती या दोन्ही मुद्द्यांमुळे प्रशासनाविरोधात असंतोष आहे. एका महिन्याच्या आत दोन्ही प्रश्न निकाली निघाले नाहीत, तर मुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री, महसूल मंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
चिमुकल्यांबरोबर पालकांचाही भ्रमनिरास
दि. १५ रोजी शाळा सुरू होणार असल्याने अनेक पालकांनी पाल्यांसाठी नवीन गणवेश, दप्तर, बूट आदी शालेय वस्तू खरेदी केल्या. शाळेचा पहिला दिवस असल्याने मुले आनंदित होते. नवीन गणवेश, दप्तर, बूट घालून आलेल्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. मात्र, शाळेला कुलूप असल्याचे पाहून चिमुकल्यांबरोबर पालकांचाही भ्रमनिरास झाला.
प्रशासनाच्या निर्णयाकडे पालकाचे लक्ष
एकनाथवाडीमधील जांभूळवाडी प्राथमिक शाळेला जागा देणाऱ्या शेतकऱ्यानेच कुलूप लावल्यानंतर प्रभारी गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड व विस्तार अधिकारी नीलेश क्षीरसागर, केंद्रप्रमुख बाळासाहेब पोळ यांनी शाळेला भेट देऊन संबंधित शेतकऱ्याशी चर्चा करून कुलूप उघडण्याची विनंती केली. मात्र, उपयोग झाला नाही. त्यामुळे या शाळेच्या मुख्याध्यापक अजिनाथ खेडकर यांनी तहसीलदार व पोलिस निरीक्षक व शिक्षण विभागाकडे स्थानिक माहिती देऊन तक्रार दाखल केली आहे. आता तालुका प्रशासन काय निर्णय घेणार याकडे पालकाचे लक्ष लागले आहे.
गटशिक्षण अधिकाऱ्याची विनवणी; शेतकरी मोबदल्यासाठी ठाम
गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड म्हणाले की, यापूर्वी शाळेच्या जागेच्या मूळ मालक असणाऱ्या शेतकऱ्याने शाळेला कुलूप लावले होते तेव्हाही मुख्याध्यापकांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तेव्हा तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याला आश्वासन देऊन शाळेचे कुलूप उघडले होते. आताही शाळेच्या पहिल्याच दिवशी या प्रश्नावर मार्ग काढेपर्यंत आम्ही शाळा पर्यायी जागेवर, मंदिराच्या सभामंडपात व खासगी जागेत भरविण्याचा निर्णय घेतला. मुलांना दप्तर व गणेवश वाटप केले. शेतकऱ्याची दोन-तीन वेळा विनवणीही केली. मात्र, शेतकरी शाळेच्या जागेचा मोबदला गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी या मागणीसाठी ठाम असल्याने मुख्याध्यापकांना शाळा पर्यायी जागेवर भरवण्यासाठी सांगितले आहे.