

नगर: अहिल्यानगर महापालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहरप्रमुख तथा माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्याविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना 18 फेब्रुवारी रोजी शिरूर (जि. पुणे) व विळद घाट (अहिल्यानगर) येथे घडल्याचे संबंधित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस कळमकर यांचा शोध घेत आहेत.
याबाबत पुणे जिल्ह्यातील एका 25 वर्षीय विवाहितेने पोलिसांत फिर्याद दिली. फिर्यादीचा आशय असा, की पीडित विवाहिता खासगी कामानिमित्त अहिल्यानगर येथे आली होती. तिने सोशल मिडीयावर अभिषेक कळमकर यांचा मोबाईल क्रमांक मिळविला. त्यावर संपर्क करून नोकरी हवी आहे, असे सांगितले. त्यानंतर कळमकर यांनी तिला कुष्ठधाम रोड येथे बोलावून शिक्षणाबद्दल विचारपूस करून नोकरी मिळवून देतो, असे सांगितले.
तीन दिवसांनी त्यांनी फोन करून सांगितले की, एमआयडीसी परिसरात माझी शाळा आहे. तेथे नोकरी देतो, असे सांगून शाळा पाहण्यासाठी बोलावले. दुसऱ्या दिवशी पीडिता शाळा पाहण्यासाठी अहिल्यानगर येथे आली असता कळमकर यांनी तिला केडगाव बाह्यवळण रस्त्यावर उतरण्यास सांगितले. तेथून काळ्या रंगाच्या आलिशान मोटारीत बसवून एमआयडीसीकडे घेऊन गेले. त्या वेळी मोटारीत दोघे असताना त्यांनी कोल्ड्रिंक्स पिण्यासाठी दिले. त्यामुळे गुंगी आल्यासारखी झाली. सुनसान ठिकाण पाहून त्यांनी मोटारकार थांबविली. हात पकडून जबरदस्ती केली. त्यावर आपल्यात काय झाले हे कोणाला सांगितले तर, नोकरी मिळणार नाही, अशी धमकी दिली.
पीडिता घाबरलेली असल्याने तिने घरी कोणालाही काही सांगितले नाही. 18 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी संशयित अभिषेक कळमकर यांनी पीडितेला व्हॉट्सॲप कॉल करून मारवेल हॉटेल शिरूर येथे बोलावले. हॉटेलच्या रूम नंबर 110 मध्ये बोलावून रूमचा दरवाजा लावून घेतला. पीडितेच्या शेजारी बसून, तू नोकरीचे टेन्शन घेऊन नको, तुला सगळा खर्च पुरवेन, असे म्हणून जवळीक साधू लागले.
पीडितेचा विरोध असतानाही त्यांनी जबरदस्तीने अत्याचार केला आणि त्याचे व्हिडीओ चित्रीकरण केले. तू आपल्या संबंधाबद्दल कोणालाही काही सांगितले तर मारून टाकीन आणि तुझा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करीन, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, गुन्ह्याचा तपास तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक जगदीश भांबळ करीत असून, पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.