

नगर / नगर तालुका: वांबोरी घाटात आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसाना अखेर यश आले. त्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने टाकळीमिया (ता. राहुरी) येथून मयताचे वडील व सख्या भावाला अटक केली. मयत दारू पिवून आई-वडिलांना मारहाण करीत असल्याने त्याचा खून केल्याची कबुली आरोपींनी दिली. त्यांना एमआयडीसी पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
शिवाजी शंकर कवाणे (वय 55), योगेश शिवाजी कवाणे (वय 30 दोन्ही रा. टाकळीमियॉ, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. किरण शिवाजी कवाणे वय रा. टाकळीमियॉ ता. राहुरी असे मयताचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, 17 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी वांबोरी ते डोंगरगण गावच्या शिवारात डोंगरगण घाटात डांबरी रस्त्यापासून वन विभागाच्या हद्दीमध्ये दरीत एक अनोळखी पुरूरूषाचा मृतदेह गोणीत भरून दरीत टाकून देवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले होते.
याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना तत्काळ मृतदेहाची ओळख पटवून आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार कबाडी यांनी पोलिस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलिस अंमलदार विष्णु भागवत, दीपक घाटकर, गणेश धोत्रे, फुरकान शेख, आकाश काळे, बाळासाहेब गुंजाळ, अमृत आढाव, प्रशांत राठोड, चालक महादेव भांड यांचे तथक तयार करून रवाना केले.
पोलिस पथकाने जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यात संपर्क करून कोणी मिसिंग आहे याबद्दल खात्री केली असता टाकळी मिया येथील एक व्यक्ती मिसिंग असून, नातेवाईकांनी तक्रार केली नसल्याचे पोलिसांना समजले.
पोलिस पथकाने 19 फेब्रुवारी 2026 रोजी टाकळीमियॉ येथे जावून शिवाजी शंकर कवाणे, योगेश शिवाजी कवाणे यांना ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता योगेश कवाणे याने त्याचा मयत भाऊ किरण शिवाजी कवाणे हा नेहमी दारू पिवून आई- वडिलांना मारहाण करीत असल्याच्या कारणावरुन वडिलांचे मदतीने खून केल्याची कबुली दिली. मयताच्या प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेली मोटारकार तपासकामी जप्त केली. गुन्ह्याच्या तपासाकामी आरोपींना एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून,एमआयडीसी पोलिस गुन्ह्याचा तपास करीत आहेत.