कळवण : पुढारी वृतसेवा : तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाचा वापर सर्व आचारसंहितेचे पालन करून योग्य पद्धतीने करावा, विरोधकांच्या पोस्टला लाइक करणारे कार्यकर्ते नकोत. पक्षाचे काम करताना स्वाभिमानाने करा, लोकहिताचे काम करा, अशा सूचना दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार तथा केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केल्या.
अभोणा येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयात कळवण तालुक्यातील पक्षीय मेळाव्याप्रसंगी त्या बोलत होत्या. कळवण तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे व कुणाला घाबरण्याची गरज नसल्याचे प्रतिपादनही यावेळी ना. डॉ. भारती पवार यांनी केले.
बैठकीस भाजपचे माजी जिल्हाप्रमुख विकास देशमुख, कळवण तालुकाध्यक्ष दीपक खैरनार, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुधाकर पगार, अभोणा शहराध्यक्ष चंद्रशेखर जोशी, तालुका सरचिटणीस कृष्णकुमार कामळस्कर, महिला आघाडी तालुकाध्यक्षा सोनाली जाधव, आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष एन. डी. गावित, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष अल्पेश शहा, आदिवासी आघाडी तालुकाध्यक्ष योगेश पवार, गणेश मुसळे आदी पदाधिकार्यांसह एस. के. पगार, स्वीय सहायक रूपेश शिरोडे, हेमंत रावले, भूषण पगार, चेतन निकम, सुनील खैरनार, सोनाली राजभोज, नंदकुमार मराठे, मनोहर ठाकरे, नाना ठाकरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, अभोणा पश्चिम पट्ट्यातील आदिवासी बांधवांच्या समस्यांचे निराकरण तत्काळ व्हावेत, यासाठी अभोणा येथे एक संपर्क कार्यालय सुरू करावे व एक स्वतंत्र समन्वयक या भागासाठी नेमावा, अशी विनंती भाजपचे अभोणा शहराध्यक्ष चंद्रशेखर जोशी यांनी केली आहे.