जळगाव: पुढारी वृत्तसेवा : जळगावसह इतर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रीसाठी घेवून सुमारे ६० लाख २२ हजारांची फसवणूक करणाऱ्या दोघांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेंद्र सतिषचंद्र ललवाणी (रा.डेमला कॉलनी) यांचे जी. एस. ग्राऊंडजवळ समर एजन्सीज नावाचे इलेक्ट्रॉनिक्स साहित्य विक्रीचे दुकान आहे. निलेश शांताराम पाटील व दिनेश पाटील या दोघांनी सन २०१३ मध्ये श्री इलेक्ट्रॉनिक्स शॉपी नावाने नाथप्लाझा येथे दुकान सुरु केले. दोघे ललवाणी यांच्याकडून होलसेल भावात इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू घेवून जात होते. त्यांनी दि. ३१ जुलै २०१३ ते ३१ मार्च २०२१ पर्यंत इलेक्ट्रॉनिक्स वस्तू रोख व उधारीने घेतले. तसेच ललवाणी यांचा विश्वास संपादन करत त्यांच्याकडे सुमारे ११ लाख ८६ हजार ७३ रुपये बाकी ठेवले. त्यामुळे बाकी पैशांसाठी संपर्क साधला असता दोघांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. महेंद्र ललवाणी यांनी निलेश व दिनेश पाटील या दोघांबाबत मार्केटमधून माहिती घेतली. अनेक व्यापार्यांचेही त्यांच्याकडे पैसे शिल्लक असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे भुसावळ, धुळे , पुणे आणि जळगावातील काही व्यापाऱ्यांची एकूण ६० लाख २२ हजारांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी ललवाणी यांच्या तक्रारीवरुन सोमवारी (दि.११) रोजी निलेश पाटील व दिनेश पाटील (दोघे रा. प्लॉट नंबर १२ भुरेमामलेदार प्लॉट, शिवाजीनगर) यांच्याविरुद्ध शहर पोलिसात फसवूणकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.