Nashik Teacher Constituency Election | तिरंगी लढत चौरंगीच्या दिशेने! शिक्षक मतदारसंघात रंगतोय आखाडा

Nashik Teacher Constituency Election | तिरंगी लढत चौरंगीच्या दिशेने! शिक्षक मतदारसंघात रंगतोय आखाडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- येत्या २६ जून रोजी होत असलेल्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीने आपापल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पूर्ण ताकद पणाला लावली आहे. ५५ तालुक्यांचा अंतर्भाव असलेल्या या मोठ्या मतदारसंघात जवळपास ६४ हजार शिक्षक मतदार आहेत. त्यांना आपलेसे करताना प्रचाराचा अजेंडा प्रत्येक पक्षाचा सारखाच दिसत आहे. नाशिकमध्ये ही लढत सुरुवातीला तिरंगी वाटत होती, मात्र ॲड. महेंद्र भावसार यांच्या बाजूने मंत्री छगन भुजबळ बोलल्यामुळे निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीने शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ॲड. संदीप गुळवे यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडी अभेद्य राहावी म्हणून वरिष्ठस्तरावर काँग्रेस नेत्यांसमवेत शिवसेनेच्या नेत्यांनी बैठक घेऊन मार्ग काढला आणि नाशिकमधून डी. बी. पाटील या काँग्रेसी उमेदवाराने अखेरच्या क्षणी माघार घेतली. विद्यमान आमदार किशोर दराडे यांनी महायुतीचा घटकपक्ष असलेल्या शिंदे गटाकडून उमेदवारी घेतली, मात्र महायुतीचाच घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने ॲड. भावसारांना एबी फॉर्म देत स्पर्धा सुरूच ठेवली. तर भाजपधार्जिणे विवेक कोल्हे यांनी अपक्ष अर्ज करत आपणही मैदानात असल्याची जाणीव करून दिली. दुसरीकडे भाजपने राज्यात वरिष्ठ मंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू डॉ. राजेंद्र विखे यांची माघार करून घेतली.

रयत शिक्षण संस्था ही ॲड. गुळवे यांच्या पाठीशी उभी आहे, तर उत्तर महाराष्ट्रातील मोठी संस्था मविप्रनेही ॲड. गुळवे यांना पाठिंबा दिला आहे. मात्र, मविप्रच्या माजी सरचिटणीस नीलिमा पवार या माजी आमदार शंकरराव कोल्हे यांच्या कन्या आहेत, त्यामुळे त्या कोल्हे यांच्या पाठीशी आहेत. तसेच क. का. वाघ संस्थेतदेखील कोल्हे यांचे नातेसंबंध असल्याने त्यांचा पाठिंबा कोल्हेंना असणार आहे. त्यामुळे ही लढाई राजकीय तसेच नात्यागोत्यांवर होणार आहे.

या निवडणुकीमध्ये नाशिक आणि नगरच्या शिक्षक मतदारांचा दबदबा बघायला मिळतो. यांची एकगठ्ठा मते ज्या उमेदवाराच्या पारड्यात पडतील, तो उमेदवार निवडून येतो, असा समज आहे. यंदा नाशिकमधून विद्यमान किशोर दराडे आणि संदीप गुळवे, धुळ्यातून महेंद्र भावसार, तर नगरमधून अपक्ष कोल्हे आणि प्रा. भाऊसाहेब कचरे उमेदवारी करत आहेत.

'टीडीएफ'मध्ये फाटाफूट

गेल्या सहा निवडणुकांपैकी पाच वेळा शिक्षक लोकशाही आघाडीच्या माध्यमातून आमदार निवडले गेले आहेत. यंदादेखील टीडीएफच्या वतीने प्रा. भाऊसाहेब कचरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र टीडीएफमध्येच आता फूट पडल्याने त्यांची मते विभागली गेली आहेत.

मतदार संख्या

जिल्हा           संख्या           प्रलंबित

नाशिक         २३,५९७        २,१८३

अहमदनगर   १४,६९२        ३,११५

जळगाव.       १३,०५६        ५८

धुळे              ८,०८८          ८०

नंदुरबार       ५,४१९          १०३

हेही वाचा –

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news