Nashik News | महाऑनलाईन पोर्टलवर आधारचा पर्याय नसल्याने केवायसी रखडली,

Nashik News | महाऑनलाईन पोर्टलवर आधारचा पर्याय नसल्याने केवायसी रखडली,

देवळाली कॅम्प (नाशिक): सुधाकर गोडसे
अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसान भरपाईसाठी महाऑनलाईन पोर्टलवर नुकसान भरपाईची आधार प्रणाली करणे हा पर्यायच येत नसल्यामुळे नाशिक तालुक्यातील ७०० शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. हे शेतकरी भरपाईपासून वंचित राहण्याची भिती आहे. पोर्टलवरील आधार प्रणालीचा पर्याय त्वरित कार्यान्वित करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना भगूर शहर प्रमुख काकासाहेब देशमुख यांच्यासह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी केली आहे.

  • नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासकीय नियमानुसार केवायसी करणे सक्तीचे आहे.
  • शासनाच्या सीएससी महाऑनलाईन पोर्टलवरील आधार प्रणालीत प्रमाणिकरण हा पर्याय नाही.
  • भगूर शिवसेना शहर प्रमुख काकासाहेब देशमुख यांनी वेधले लक्ष

जिल्ह्यात २०२१ ते २०२३ या काळात नाशिक तालुक्यातील भगूर, लहवित, देवळाली कॅम्प, लोहशिंगवे, वंजारवाडी तसेच इगतपुरी व नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात अतिसृष्टी झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. तसेच अनेक शेतकऱ्यांचेे घरे जमीनदोस्त झाली होती. परिसरातील तलाठ्यांनी पंचनामे केल्यानंतर दोन वर्ष होऊनही आजवर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. शासनाने 5 जूनला पिकांच्या नुकसान भरपाईची शासकीय यादी जाहीर केली आहे. त्यात नाशिक तालुक्यातील ७०० शेतकर्‍यांचे या यादीत नावे आलेले आहे. यातील बहुतांश शेतकरी हे देवळाली, भगूर परिसरातील आहे.

यादीमध्ये नाव आलेल्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासकीय नियमानुसार केवायसी करणे सक्तीचे आहे. त्यासाठी शासनाने नेमून दिलेल्या सेतू कार्यालयात केवायसी करणे गरजेचे आहे. परंतु शासनाच्या सीएससी महाऑनलाईन पोर्टलवरील आधार प्रणालीत प्रमाणिकरण हा पर्याय उघडतच नसल्यामुळे सध्या ९० टक्के शेतकरी केवायसीपासून वंचित आहेत.

पेरण्यांना खोळंबा

सध्या पाऊस सुरु झाल्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीची कामांची घाई असताना ते काम बाजूला ठेवावे लागले आहे. पीक नुकसान भरपाईचे पैसे मिळण्यासाठी शेतकरी रोज सेतू कार्यालयात चकरा मारत आहेत. नाशिक तहसील महाऑनलाईन पोर्टलवर केवायसीची आधार प्रणालीचा पर्याय येत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा वेळही वाया जात आहे व मानसिक त्रास देखील होत आहे. नाशिक जिल्हा तहसीलच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांना दररोज पाच-सहा तास वाया जात आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनाच थेट साकडे

जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी तातडीने लक्ष घालून आधार प्रणाली पर्याय त्वरित चालू करणेबाबत संबंधित विभागास आदेश द्यावे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केवायसी करून आपली नोंदणी करता येईल, अशी मागणी भगूर शेतकी सोसायटीचे व्हाईस चेअरमन व शिवसेना उबाठा गटाते शहरप्रमुख काकासाहेब देशमुख, चेअरमन भाऊसाहेब गायकवाड यांनी केली आहे. संजय गायकवाड, भूषण करंजकर, बाळासाहेब पाटोळे, राजेंद्र डोंगरे, युवराज शिरसाट, सुभाष जाधव, रामकिसन करंजकर, राजेंद्र देशमुख, रामदास बोराडे, भिका करंजकर, गणेश निसाळ या शेतकऱ्यांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनही दिलेले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news