Dhule News |अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करणार, धुळे जिल्ह्यात पंधरा दिवसांची मोहीम

Dhule News |अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करणार, धुळे जिल्ह्यात पंधरा दिवसांची मोहीम

धुळे पुढारी वृत्तसेवा- धुळे जिल्ह्यात 6 ते 21 जून 2024 या कालावधीत अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविला जाणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके यांनी दिली आहे.

अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून धुळे जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत अतिसार व्यवस्थापनासाठी जागरुकता निर्माण करणे, अतिसाराच्या प्रकरणाच्या व्यवस्थापनासाठी तरतूद करणे, ओआरएस व झिंग कॉर्नरची स्थापना करणे. अति जोखमीचे क्षेत्र आणि दुर्बल घटकांवर विशेष लक्ष देवून ही विशेष मोहिम प्रभावीपणे राबविण्याच्या सुचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी दिल्या आहेत.

आरोग्य विभागाचे धोरण

  • या मोहिमेत पाच वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या बालकांच्या घरामध्ये ओआरएस व झिंकचा वापर तसेच उपलब्धता वाढवणे.
  • अतिसारासह जलशुष्कता असलेल्या बाल रुग्णांचे व्यवस्थापन करण्यासाठी आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करणे.
  • शहरी झोपडपट्टया, पूरग्रस्त भाग, आरोग्य सेविका कार्यरत नसलेली उपकेंद्रे, भटक्या जमाती, वीटभट्टी कामगार, स्थलांतरीत मजूर आणि बेघर मुले इत्यादी यासारख्या जोखीमग्रस्त घटकांवर विशेष लक्ष देणे.
  • मागील 2 वर्षात अतिसाराची साथ असलेले क्षेत्र व पाणीपुरवठा व स्वच्छतेचा अभाव असलेले क्षेत्र यावर विशेष लक्ष देणे हे धोरण आरोग्य विभागाने निश्चित केले आहे.

घरोघरी जाऊन ओआरएस व झिंक गोळ्यांचे वाटप

धुळे जिल्ह्यात 0 ते 5 वर्षांतील ग्रामीण व शहरी भागातील एकूण 1 लाख 87 हजार 567 असून या विशेष मोहिमेत 1 हजार 590 शाळा व जिल्ह्यातील सर्व अंगणवाडीमध्ये आशा व आरोग्य कर्मचारी हे लाभार्थीना अतिसार नियंत्रण पंधरवडा या कालावधीत घरास भेट देवून अतिसार 0 ते 5 वर्षाच्या बालकांना ओआरएस व झिंक गोळ्यांचे वाटप करण्यात येईल. तसेच 8 ते 10 मातांचा/घरांचा गट तयार करून त्यांना ओआरएसचे मिश्रण कसे तयार करावे व बाळाला ते कसे द्यावे याबाबत माहिती देतील. पाच वर्षाखालील मुलांच्या अतिसार प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी कार्य करणाऱ्या काळजी घेणाऱ्या पालकाचे योग्य समुपदेशन करण्यात येवून आशा मार्फत गृहभेटीमध्ये ओआरएस तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. तसेच हात धुण्याचे प्रात्यक्षिक ही करून अतिसार रोग प्रतिबंधासाठी जनजागृती करण्यात येणार आहे.

अतिसार व उपचार

अतिसारामध्ये ओआरएसचे द्रावण व झिंक गोळी सर्वात प्रभावी उपचार पद्धती असून अतिसाराला प्रतिबंध घालण्यासाठी आवश्यक त्या विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन (ओआरएस) आणि जस्त हे अतिसार उपचारांसाठी जागतिक मानक आहे. त्याच्या सोप्या सादरीकरणात, ओआरएस हे पाणी, साखर आणि मीठ यांचे मिश्रण आहे. हे संयोजन शरीरातील द्रव बदलण्याची गती वाढवते. यामुळे लाखो लोकांचे जीव वाचले आहेत. ओआरएस नंतर, झिंकचा एक कोर्स, एक सूक्ष्म पोषक, अतिसाराचा कालावधी आणि तीव्रता कमी करतो. झिंक रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते, पुनप्राप्ती जलद होण्यास मदत करते आणि तीन महिन्यांपर्यंत अतिसार टाळू शकते. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बोडके यांनी दिली आहे.

हेही वाचा-

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news