Nashik News | फ्रीजरमधून सोन्याचे दागिने लंपास, कुटुंबीय तीर्थाटनाला गेल्याची साधली संधी

फाईल फोटो
फाईल फोटो

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- देवदर्शनासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबीयांच्या घरात चोरट्याने घरफोडी करून एक लाख ६८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. हे दागिने कुटुंबीयांनी फ्रीजरमध्ये लपवले होते, मात्र तरीदेखील चोरट्याने ते शोधले हे विशेष. वडाळा गाव येथील जय मल्हार कॉलनीत हा प्रकार घडला. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.

नरेंद्र वनवे (५४) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे नातलग अनिता पिंगळे यांच्या घरात दि. ३ ते ५ जून दरम्यान ही घरफोडी झाली. पिंगळे कुटुंबीय दि. ३ जूनच्या रात्री जगन्नाथ पुरी येथे देवदर्शनासाठी गेले होते. त्यानंतर दि. ५ जून रोजी मध्यरात्री 1 वाजता त्यांचे जावई आशुतोष लेंडे हे पुणे येथून नाशिकमध्ये विधी परीक्षेसाठी आले होते. त्यांनी सासऱ्यांच्या घराचा मुख्य दरवाजा स्वत:कडील किल्लीने उघडला. त्यावेळी घरात चोरी झाल्याचा संशय आल्याने त्यांनी वनवे यांना कळविले. तसेच याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी बंगल्याची पाहणी केली. त्यात घरातील कपाट आणि मागील दरवाजा उघडा होता. टेरेसचा लोखंडी दरवाजाही उघडा होता. यासह तेथील भिंतीचा भाग तुटलेला आढळला. त्यामुळे चोरटा टेरेसच्या दरवाजाने घरात शिरल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, पिंगळे यांनी वनवे यांना फ्रीजरमधील दागिने बघण्यास सांगितले. मात्र दागिने लंपास झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे चोरट्यांनी दागिने चोरल्याचे उघड झाले. याप्रकरणाचा तपास मुंबई नाका पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक निसार शेख करीत आहेत.

एकाच इमारतीत दोन घरफोड्या

आनंदवली येथील रिजेन्सी टॉवर येथे चोरट्याने दोन घरांत घरफाेडी केल्याचा प्रकार उघड झाला. संजय मराठे यांच्या फिर्यादीनुसार, चोरट्याने बुधवारी (दि. ५) दुपारी घरफोडी करून सोन्या-चांदीचे ९४ हजार ५०० रुपयांचे दागिने लंपास केले, तर मराठे यांचे शेजारी महेश लादे यांच्या घरातून सहा हजार रुपये रोख व चार पेनड्राइव्हसह आधारकार्ड, स्कूलबॅग चोरट्याने लंपास केली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा –

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news