कुरुंदवाड, पुढारी वृत्तसेवा : हेरवाड (ता.शिरोळ) येथे कारने रस्त्याकडेला थांबलेल्या दुचाकीला आणि एका डिजिटल फलकाला उडवल्याची घटना घडली. ही कार पाच मैलहून कुरुंदवाडच्या दिशेने जात असताना अपघात घडला. कार पलटी झाली. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. हेरवाडमधील नागरिकांनी पलटी झालेल्या कारमधील प्रवाशांना बाहेर काढले. अपघातात दुचाकीचे ऊसाचे रस काढणाऱ्या यंत्राचे असे जवळपास लाखो रुपयांचे नुकसान झाले. या प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथील भीमराव बाबुराव डंबाळे हे कारने (क्र. एम.एच 42 बी.बी 6087) आपल्या कुटुंबीयांसह आदमापूर बाळूमामा येथे देवदर्शन करून नृसिंहवाडी येथे देवदर्शनासाठी जात होते. दरम्यान, एक वाजण्याच्या सुमारास हेरवाड चौकात वळण घेताना वाहन भरधाव असल्याने चालक डंबाळे याचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे ही कार वाहन थेट अरिहंत टायर्स पंचर दुकानासमोर लावलेल्या दुचाकी, उसाच्या रसाचे यंत्र आणि दुकानाचा डिजिटल फलक उडवत लगतच्या शेतात पलटी झाली. अपघातावेळी अरिहंत टायर्सच्या कामगारांची जेवणाची सुट्टी झाली होती. त्यामुळे मोठी हानी टळली.
हेरवाड येथील ॲड. अनिरुद्ध कांबळे, इर्शाद सनदी, अर्जुन जाधव, अभिजित कांबळे, अफसर मकानदार, अमजद मुल्ला, अस्लम गलगले, भोला शिंदे, महेबूब गलगले या ग्रामस्थांनी पलटी झालेल्या कारमधील चार महिला आणि तीन पुरुषांना सुखरूप बाहेर काढले.