Lok Sabha Result | नाशिकच्या ३०, दिंडोरीत २६ फेऱ्या; निकाल हाती येण्यास होणार सायंकाळ | पुढारी

Lok Sabha Result | नाशिकच्या ३०, दिंडोरीत २६ फेऱ्या; निकाल हाती येण्यास होणार सायंकाळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी शांततेत मतदान पार पडल्यानंतर साऱ्यांच्या नजरा ४ जूनच्या निकालाकडे लागल्या आहेत. अंबड येथील वेअरहाउसमध्ये मतमोजणी करण्यात येणार आहे. दिंडोरी मतदारसंघाच्या २६, तर नाशिकला मतजोजणीच्या ३० फेऱ्या पार पडणार असून, सायंकाळी ६ पर्यंत निकाली हाती येईल, अशी शक्यता निवडणूक शाखेने वर्तविली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात २० मे रोजी जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांत मतदान घेण्यात आले. यंदा उन्हाचा तडाखा असतानादेखील मोठ्या संख्येने मतदार घराबाहेर पडले. त्यामुळे एकूणच मतदान टक्क्यात वाढ झाली आहे. नाशिकमध्ये ६०.७५, तर दिंडोरीत ६६.७५ टक्के मतदान नोंदविण्यात आले आहे. मतदानानंतर दोन्ही मतदारसंघांचे ईव्हीएम हे अंबड येथील वेअरहाउस गोदामातील स्ट्राँगरूममध्ये सील केली गेली आहे. अवघ्या जिल्ह्याचे लक्ष आता निकालाकडे लागले आहे.

निवडणूक शाखेकडून मतमोजणीसाठी तयारी केली जात आहे. चार जून रोजी सकाळी ८ पासून मतमोजणीला प्रारंभ हाेणार आहे. दोन्ही मतदारसंघांची मतमोजणी वेगवेगळी केली जाणार आहे. सर्वप्रथम टपाली मते मोजली जाणार असून, त्यामध्ये सैनिक व शासकीय कर्मचाऱ्यांच्या मतांचा समावेश असेल. तसेच नाशिक व दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघांत प्रत्येकी ६ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी १४ टेबल याप्रमाणे एका लोकसभा मतदारसंघात ८४ टेबलवर ही मोजणी होणार आहे. दिंडोरीचा निकाल दुपारी तीन, तर नाशिकचा निकाल सायंकाळी ६ पर्यंत हाती येईल, असा अंदाज निवडणूक शाखेकडून वर्तविला गेला आहे.

१००० कर्मचाऱ्यांची नियुक्ती

लोकसभेच्या एका मतदारसंघांतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघ मिळून ८४ टेबलांवर मतमोजणी केली जाईल. या प्रत्येक टेबलावर ३ अधिकारी व कर्मचारी याप्रमाणे २५२ जण, तसेच १० टक्के राखीव मिळून २७८ कर्मचारी असतील. याशिवाय एकूण ९७ सूक्ष्म निरीक्षक, पोस्टलकरीता ३५ व टॅब्युलेशनकरीता ७५ व अन्य कर्मचारी ६५ असे सर्व मिळुन सुमारे ५०० च्या आसपास कर्मचारी असतील. दाेन्ही मतदारसंघ मिळुन जवळपास एक हजार कर्मचारी मतमोजणी प्रक्रीयेत सहभागी असतील.

हेही वाचा –

Back to top button