बलात्‍कारातून जन्‍मलेल्‍या मुलाने तब्‍बल ३० वर्षांनी आईला मिळवून दिला ‘न्‍याय’! | पुढारी

बलात्‍कारातून जन्‍मलेल्‍या मुलाने तब्‍बल ३० वर्षांनी आईला मिळवून दिला 'न्‍याय'!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ती केवळ १२ वर्षांची होती. यावेळी दोन नराधमांनी तिच्‍यावर बलात्‍कार केला. ती गर्भवती राहिली. तिने एका मुलाला जन्‍म दिला. यानंतर तब्‍बल १७ वर्ष तिने मुलाचा चेहरा पाहिला नव्‍हता. मात्र मुलगा आपल्‍या आईचा शोध घेत तिच्‍या घरी आला. माझे वडील कोण, असा सवाल त्‍याने आईला केला. आपल्‍या आईवर झालेल्‍या अत्‍याचाराची माहितीत्‍याला मिळाली. अखेर आपल्‍या आईला न्‍याय मिळवून देण्‍याचा निर्धार त्‍याने केला. याच निर्धाराने एका बलात्‍कार पीडितेला तब्‍बल ३० न्‍याय मिळाला आहे. न्‍यायालयाने १२ वर्षांच्‍या अल्‍पवयीन मुलीवर बलात्‍कार करणार्‍या दोघा नराधमांना १० वर्षाची शिक्षा सुनावली आहे. तसेच प्रत्‍येकी ३० हजारु रुपयांचा दंडही ठोठावला आहे. एखाद्या चित्रपटाची कथा शोभावी, अशी ही घटना उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूर जिल्‍ह्यात घडली आहे.

३० वर्षांपूर्वी अल्‍पवयीन मुलीवर अत्‍याचार

१९९४ मध्‍ये पीडिता १२ वर्षांची होती. शाहजहांपूरमध्‍ये ती आपल्‍या मोठी बहिण आणि भाऊजींसोबत राहत होती. त्‍यांच्‍या घराच्‍या जवळ राहणार्‍या नकी अहमद उर्फ ​​ब्लादेई आणि त्याचा भाऊ गुड्डू या सख्ख्या भावांनी तिच्‍यावर बलात्‍कार केला. या अत्‍याचारानंतर ती गर्भवती रहिली. तिच्‍या बहिणीने दोघा भावांविरोधात तक्रार करण्‍याचा प्रयत्‍न केला मात्र पीडितेच्‍या कुटुंबाला या दोघा भावांनी धमकी दिली. डॉक्टरांनी मुलगी अल्‍पवयीन असल्‍याने गर्भपात करण्यास नकार दिला. बहिण पीडित मुलीला घेऊन रामपूरला गेली. तेथे पीडित मुलीने एका मुलाला जन्‍म दिला. काही दिवसांनंतर तिने मुलाबाबत विचारणा केली असता मुलाला रेल्‍वेत सोडून असल्‍याचे कुटुंबीयांनी तिला सांगितले. पीडित मुलगी प्रौढ झाल्यावर कुटुंबीयांनी तिचे लग्न केले. लग्नानंतर तिला मुलगा झाला. मात्र काही काही दिवसांनी पतीला तिच्‍या भूतकाळाबाबत माहिती मिळाली. पतीने तिला मुलासह घराबाहेर काढले. पीडित महिला आपल्या मुलासह लखनौला आली.

१७ वर्षानंतर मुलाची आणि आईची भेट

अत्‍याचारातून जन्‍माला आलेल्‍या मुलाला पीडित मुलीच्‍या नातेवाईकाने हरदोई येथील नातेवाईकांना दिले होते. या नातेवाईकांनी मुलाला १७ व्‍या वर्षी त्‍याच्‍या जन्‍माचे सत्‍य सांगितले. २०१२ मध्‍ये मुलगा आईचा शोध घेत लखनौला आला. तब्‍बल १७ वर्षानंतर मुलाची आणि आईची भेट झाली.

आईने मुलाला सांगितली अत्‍याचाराची कहाणी

२०१२ पासून मुलगा आपल्‍या आईसोबत राहू लागला. माझे वडील कोण, असा सवाल मुलगा आईला वारंवार करु लागला. तुझा वडिलांचा मृत्‍यू झाला आहे, असे खोट कारण त्‍याला सांगण्‍यात आले. मात्र त्‍याचा विश्‍वास बसला नाही. अखेर २०१९ मध्‍ये त्‍याने सत्‍य समजलं नाही तर जीवन संपवू, अशी धमकीच त्‍याने आपल्‍या आईला दिला. अखेर आईने लहानपणी तिच्‍यावर झालेल्‍या अत्‍याचाराची माहिती मुलाला दिली.

मुलांच्‍या पाठबळावर आईचा न्‍यायासाठी लढा, डीएनए चाचणीतून उलगडले सत्य

मुलाने महिलेला तिच्‍यावर लहानपणी झालेल्‍या अत्‍याचाराविरोधात लढण्‍याला पाठिंबा दिला. तोच आपल्‍या आईला घेवून शाहजहांपूर पोलिस ठाण्यात गेला. येथे तिने नाकी आणि त्याचा भाऊ गुड्डू या दोघांविरोधात बलात्‍काराची फिर्याद दिली. पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारताच दोघेही फरार झाले. पोलिसांनी दोघांवरही 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. अखेर दोघा भावांना अटक झाली. न्यायालयाच्या आदेशानुसार, डीएनए चाचणी घेण्‍यात आली. हा मुलगा नाकी याचाअसल्‍याचे डीएनए चाचणीत स्‍पष्‍ट झाले. शाहजहांपूरचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश शास्तम लवी यादव यांनी नकी आणि त्याचा भाऊ गुड्डू या दोघांना बलात्‍कार प्रकरणी 10 वर्षांची सक्तमजुरी आणि प्रत्येकी 30,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आणि तब्‍बल ३० वर्षानंतर एका बलात्‍कार पीडितेला अत्‍याचारातून जन्‍माला आलेल्‍या मुलाच्‍या मदतीने न्‍याय मिळाला.

मला आता कसलीच भीती वाटत नाही…

माझ्या मुलानेच मला माझ्या बलात्काऱ्यांशी लढण्याचे बळ दिले. मला आता कसलीच भीती वाटत नाही, अशा शब्‍दात पीडिते माध्‍यमांशी बोलताना आपल्‍या भावनांना वाट करुन दिली.

हेही वाचा :

Back to top button