सांगवी : पुढारी वृत्तसेवा : सन 1978 मध्ये दोन्ही काँग्रेसचे सरकार चांगले चालले होते. यशवंतराव चव्हाणांचा विरोध असताना देखील शरद पवारांनी बंडखोरी व डावपेच आखून सरकार पाडलं आणि ते मुख्यमंत्री झाले. अनेक दिग्गज नेते त्यांच्या मंत्रिमंडळात आले. यशवंतराव चव्हाण यांनी शरद पवारांना मानसपुत्र मानले होते, त्यांना ही भूमिका आवडली नव्हती. लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्यावर आरोप केले. मग मी काय गद्दारी केली? साठीच्यावर माझं वय झालं तरी मी तुमचंच सगळं ऐकत आलो. वय झाल्यावर तरुणांच्या हातात कारभार दिला जातो, पण तसे झाले नाही, असा आरोप करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.
सांगवी (ता. बारामती) येथे रविवारी (दि. 28) बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुती, मित्रपक्षांच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ना. अजित पवार बोलत होते. या वेळी माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष व विद्यमान ज्येष्ठ संचालक सहकारमहर्षी चंद्रराव तावरे, बाळासाहेब तावरे, संचालक राजेंद्र ढवाण पाटील, दूध संघाचे माजी अध्यक्ष प्रकाशराव तावरे, नितीन आटोळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, पंचायत समितीचे माजी सभापती करण खलाटे, रणजित धुमाळ, प्रतापराव तावरे, महेश तावरे, सरपंच चंद्रकांत तावरे, विनोद तावरे, वीरेंद्र तावरे, माजी उपसरपंच बाळासाहेब तावरे यांच्यासह विविध संस्थांचे व संघटनांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी अजित पवार म्हणाले, सरकार पडल्यानंतर रामटेक बंगल्यावर बैठक सुरू होती. तिथं यशवंतराव चव्हाणांचा फोन आला होता, परंतु फोन घेतला गेला नाही. तो जोरात आपटत ठेवून दिला. सन 1978 मध्ये "पुरोगामी लोकशाही दल" म्हणजेच "पुलोद"चं सरकार स्थापन होऊन शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. दीड वर्षांहून अधिक काळ हे सरकार चाललं. दरम्यानच्या काळात देशातील समीकरणंही बदलली. जनता पक्षात फूट पडली. शेवटी इंदिरा गांधीनी शिफारस केल्यावर राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लागू झाली आणि पवारांचं पहिलं सरकार बरखास्त झालं. लोक माझे सांगाती या पुस्तकात सर्व लिहिलेले आहे, असे सांगत अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शरसंधान साधले.
बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वांगीण विकास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी त्यांच्या विचारांचा खासदार आपल्याला लोकसभेत पाठवायचा आहे. या मतदारसंघातील खासदार सत्तेत राहिल्यास शेतीसाठी पाणी उपलब्ध करण्यासाठी मदत होणार असल्याचे सांगून अजित पवार म्हणाले, दळणवळणासाठी दर्जेदार रस्ते, रेल्वे, औद्योगिकरण वाढविण्यासाठी मदत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी भाजपा सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष युवराज तावरे पाटील, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष किरण तावरे, माळेगाव कारखान्याचे संचालक अनिल तावरे यांनी मनोगत व्यक्त केले. माळेगाव कारखान्याचे माजी संचालक विजय तावरे यांनी सूत्रसंचालन केले. आशीष तावरे यांनी आभार मानले.
बारामतीत लोकसभेसाठी सुनेत्रा पवार यांच्याविरुद्ध सुप्रिया सुळे अशी नणंद-भावजय यांची लक्षवेधी लढत होणार आहे. संपूर्ण राज्याचे या निवडणुकीकडे लक्ष लागून आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोन्ही गटांमधून एकमेकांवर टीकाटिपणी होताना दिसत आहे. अशातच पत्रकाराशी संवाद साधताना मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक आहे, असे विधान करीत सुनेत्रा पवार यांच्यावर शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. त्या विधानावरून राजकीय वर्तुळात अनेक आरोप-प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहेत. अजित पवार यांनी या मुद्द्याला धरून आपल्या पत्नीवरील झालेल्या टीकेला प्रत्युत्तर देत बारामतीच्या सर्व सुनांनी आता घड्याळासमोरील बटन दाबून सून बाहेरची असते का घरची हे दाखवून द्या, असे आवाहन केले.
हेही वाचा