नाशिकमधून शांतिगिरी महाराज, वाजे, दिंडोरीतून भगरे, धुळ्यात डॉ. भामरेंचे अर्ज दाखल | पुढारी

नाशिकमधून शांतिगिरी महाराज, वाजे, दिंडोरीतून भगरे, धुळ्यात डॉ. भामरेंचे अर्ज दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीत सोमवारी (दि.२९) उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. नाशिकमधून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी तर शांतीगिरी महाराज यांनी शिवसेनेच्या (शिंदे गट) नावाने नामनिर्देशन पत्र भरले. दिंडाेरीतून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांनी अर्ज भरला. धुळे मतदारसंघात भाजपचे डॉ. सुभाष भामरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

शांतिगिरी महाराजांच्या अर्जामुळे महायुतीत नवीन व्टिस्ट निर्माण झाला आहे. त्यांनी शिवसेना-शिंदे गटातर्फे आपण अर्ज भरला असल्याचा दावा केला असला तरी महायुतीच्या नेत्यांनी कोणालाही उमेदवारी दिलेली नसल्याचा दावा केला. शांतिगीरी महाराजांना शिवसेनेची उमेदवारी ही केवळ अफवा असल्याचे सांगत नाशिकच्या उमेदवारीचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडून मंगळवारी(दि.३०) सायंकाळपर्यंत जाहीर केला जाईल, असा दावा खासदार हेमंत गोडसे यांनी केला. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार नाशिकच्या उमेदवारीसाठी ज्यांचे नाव घोषित करतील, त्यांचा आम्ही प्रचार करू, अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.

दोन दिवसांच्या सुट्यानंतर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नाशिक व दिंडाेरी मतदारसंघासाठी अर्ज भरण्यास सुरवात झाली. यावेळी नाशिकमधून वाजे, शांतीगिरी महाराज यांच्यासह सैनिक समाज पार्टीच्या जयश्री पाटील व अपक्ष देविदास सरकटे अशा चार उमेदवारांचे अर्ज प्रशासनाकडे दाखल झाले. दिंडोरीतून भगरे यांचा अर्ज आला आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभरात नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातून दिवसभरात ६३ अर्जांची विक्री झाली. ३५ उमेदवारांनी ही अर्ज खरेदी केले. अर्ज नेणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने महंत अनिकेत शास्त्री, शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी लोकसभा प्रमुख विजय करंजकर, निवृत्ती अरिंगळे यांचा त्यात समावेश आहे.

हेही वाचा –

Back to top button