‘त्या’ अतृप्त आत्म्याने महाराष्ट्र अस्थिर केला : पंतप्रधान मोदींचा शरद पवारांवर नाव न घेता हल्लाबोल

‘त्या’ अतृप्त आत्म्याने महाराष्ट्र अस्थिर केला : पंतप्रधान मोदींचा शरद पवारांवर नाव न घेता हल्लाबोल

Published on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आपल्याकडे म्हणतात काही अतृप्त आत्मे असतात. त्यांची स्वप्नं पूर्ण झाली नाही, तर ते दुसर्‍याच्या स्वप्नांमध्येही माती कालवतात. अशाच इथल्या एका बड्या नेत्याने महत्त्वाकांक्षेसाठी राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण केली. घरातही अस्थिरता निर्माण केली. आता हा भटकता आत्मा देश अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी खरमरीत टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांचे नाव न घेता केली. जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघांसाठी पुण्यातील रेसकोर्स मैदानात सोमवारी (दि.29) झालेल्या जाहीर प्रचारसभेत मोदी बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, मनसे नेते अमित ठाकरे, महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवार, मुरलीधर मोहोळ, शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, माजी मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार मेधा कुलकर्णी, डॉ. नीलम गोर्‍हे, माधुरी मिसाळ या वेळी उपस्थित होते.

मोदी यांनी भाषणाची सुरुवात मराठी बोलून केली. भाषणाच्या पहिल्या भागात त्यांनी भाजपने केलेल्या विकासाचे मुद्दे सांगण्यावर भर दिला. त्यानंतर त्यांनी शरद पवार, काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि विरोधकांच्या आघाडीवर टीका केली. पवार यांचे नाव न घेता मोदी म्हणाले, काही आत्मे भटकत राहतात. महाराष्ट्रात 45 वर्षांपूर्वी एका मोठ्या नेत्याच्या महत्त्वाकांक्षेने या खेळाची सुरुवात झाली. तेव्हापासून महाराष्ट्रात अस्थिरतेला प्रारंभ झाला. विरोधकांत राहूनही आत्मा काहीतरी करू पाहत आहे. तसेच, आता ते त्यांच्या परिवारातही करत आहे. राज्यात भाजप- शिवसेना युतीचे सरकार 1995 मध्ये आले, तेव्हाही त्यांनी अस्थिर करण्याचा प्रयत्न केला. 2019 मध्ये जनादेशाचा मोठा अपमान करत सत्ता स्थापन केली. देशात अस्थिरता निर्माण करण्याचा खेळ सुरू आहे. देशात, महाराष्ट्रात स्थिर सरकार निर्माण झाले पाहिजे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात पुढील 25 ते 30 वर्षे स्थिर सरकार झाले पाहिजे.

राहुल गांधी यांच्यावर टीकेची झोड उठविताना मोदी म्हणाले, काँग्रेसचे शहजादे हे तुमच्या संपत्तीची तपासणी करणार आहेत. लॉकर, घराचा एक्स-रे काढणार आहेत. स्त्रीधन, मंगळसूत्र यांची तपासणी होईल. त्यावर कर लावण्याचा विचार आहे. सर्व काँग्रेसच ठरविणार. अशा माओवादी विचाराने काम केल्यास, गुंतवणूक कोण करणार. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान हे ईश्वरापेक्षा कमी नाही. मी संविधान दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. आंबेडकर यांच्या स्थानाचा विकास केला, असे मोदी यांनी सांगितले. काँग्रेस, इंडिया आघाडी संविधानाच्या पाठीत सुरा भोसकण्याचे काम करत असल्याची टीका त्यांनी केली.

धर्माच्या नावावर आरक्षण देणार नाही

काँग्रेसवाले धर्माच्या नावावर आरक्षण देण्याचा डाव रचत आहेत. दलित, ओबीसी, आदिवासींचे आरक्षण संविधानाने दिले आहे. त्यामध्ये ते मुस्लिमांना आरक्षण देण्याची योजना आखत आहेत, असा आरोप मोदी यांनी केला. कर्नाटकात त्यांनी एका रात्रीत मुस्लिमांना ओबीसीत आरक्षण दिल्याचा दावा त्यांनी केला. तुम्ही यशस्वी होऊ देणार आहात का, असा प्रश्न त्यांनी सभेतील उपस्थितांना विचारला. इंडिया आघाडीने लक्षात ठेवावे की मोदी अजून जिवंत आहे. धर्माच्या नावावर आरक्षण लागू होऊ देणार नाही.

पुण्याने देशाला दिले समाजसुधारक संत

कसे आहात पुणेकर… अशी साद घालत मोदी यांनी विराट सभेत बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले, इथे केशरी रंग सर्वत्र दिसत आहे. इथे लहान मुलं माझी वेगवेगळी चित्र घेऊन आली, त्यांनी खाली बसावे. या भूमीने अनेक समाजसुधारक देशाला दिले. आज ही भूमी जगाला संशोधक देत आहे. पुणे जेवढे प्राचीन आहे तेवढे भविष्याकडे वाटचाल करणारे आहे. पुणे तिथे काय उणे असे त्यामुळेच म्हणतात. काँग्रेसने देशात 60 वर्षे राज्य केले, पण त्यांनी 50 टक्के जनतेला साध्या मुलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न केला नाही. पण, आम्ही दहा वर्षांत मुलभूत सुविधा पूर्ण केल्याच पण त्यासोबत समाजातील प्रत्येक वर्गाची आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. विविध विकास प्रकल्प हे विकसित भारताचे स्वप्न आहे.

बुलेट ट्रेनमध्ये बसणारे पुणेकर पहिले

मोदी पुढे म्हणाले, ही मोदीची गॅरंटी आहे, देशात सर्वांत पहिले बुलेट ट्रेनमध्ये तुम्ही प्रवास करणार आहात. काँग्रेसने मनमोहन सिंग यांच्या रिमोट कंट्रोल सरकारच्या काळात दहा वर्षांत जे पैसे मुलभूत गरजांवर खर्च केले ते आम्ही एका वर्षात करत आहोत. स्टार्टअप इंडियामध्ये युवकांनी सव्वा लाख स्टार्टअप बनवले आहेत. त्यातील अनेक पुण्यात आहेत. रिफॉर्म, ट्रान्सफॉर्म, परफॉर्म यावर आम्ही भर दिला. सर्वाधिक पेटंट युवकांच्या नावावर आहेत. दहा वर्षांपूर्वी आपण मोबाईल आयात करत होतो. पण, आता आपण जगात दुसऱ्या क्रमांकाचे निर्यातदार बनलो आहे.

काँग्रेसचा देशाच्या संपत्तीवर डोळा

मोदी पुढे म्हणाले, मेड इन इंडिया अंतर्गत विविध क्षेत्रात विकास संधी दिली जात आहे. संशोधन हब, सेमी कंडक्टर हब, हायड्रोजन हब यावर लक्ष्य केंद्रित केले जात आहे. मध्यमवर्गीय, गरीब यांना दिलासा देण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले आहे. देशात लायसन राज पुन्हा हवे आहे का? सरकारला सवयच झाली आहे की, सामान्यांच्या कामात अडथळा आणायचा. पण माझे स्वप्न आहे की, 2047 पर्यंत सर्व सरकारी कटकट बंद करणे. काँग्रेसच्या युवराजला विचारले की, गरिबी कशी हटणार तर तो सांगतो खटाखट, खटाखट,खटाखट… विकास कसा ठकाठक, ठकाठक, ठकाठक… विकसित भारत टकाटक, टकाटक, टकाटक… ते आता देशातील नागरिकांच्या संपत्तीवर लक्ष्य केंद्रित करत आहेत. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सतत अपमान केला आहे. भाजपने संविधान दिवस सुरू केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी निगडित स्थाने पंचतीर्थरूपात विकसित केली.

140 कोटी जनतेचा इको चांगला

भाषणाच्या सुरुवातीलच मोदी अचानक थांबले, माईक सिस्टिमवाल्यांकडे पाहत ते म्हणाले, माझ्या माईकचा इको तुम्ही वाढवला आहात काय… तो कमी करा. मला तो नकोय, मला इकोची गरज नाही. माझ्या देशातील 140 कोटी जनतेचा इको मला पुरेसा आहे.

काँग्रेसमुळेच वाढला दहशतवाद

मोदी यांनी काँग्रेसवर टीकेची झोड उठविली. ते म्हणाले, काँग्रेसच्या तुष्टीकरणामुळेच देशात दहशतवाद वाढला. मुंबई- पुण्याला रक्तरंजित केले. पुण्यातील जर्मन बेकरीत काय झाले होते, इथे तुम्ही बाहेर जाताना जातो नाही, तर येतो म्हणता. पण, काँग्रेसच्या राज्यात बाहेर जाणारा मुलगा घरी परत येण्याची गॅरंटी नव्हती. मुंबई, काशी, अयोध्येत असे हल्ले झाले की नाही असे सभेला विचारत ते म्हणाले, 'आता बंद झाले की नाही असे हल्ले… दहशतवाद्यांना खायला अन्न मिळत नाही, अशी अवस्था झालीय त्यांची. या दहशतवाद्यांना मी सोडणार नाही. त्यांच्या घरात घुसून मारेल हा मोदी.'

मोदींच्या सभेतील क्षणचित्रे

  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राम मंदिर आणि त्यावर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षचिन्ह असलेली प्रतिमा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देऊन त्यांचे स्वागत केले.
  • पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी दिग्विजय पगडी घालून तसेच अश्वारूढ शिवप्रतिमा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. ही पगडी परिधान करूनच मोदी यांनी भाषण दिले.
  • प्रदेश भाजपच्या वतीने उपाध्यक्ष राजेश पांडे, लोकसभा समन्वयक श्रीनाथ भिमाले, शहराध्यक्ष धीरज घाटे, गणेश बिडकर, राजेंद्र शिळीमकर यांनी मोदींचे स्वागत केले.
  • दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या स्नूषा आणि भाजपच्या पदाधिकारी स्वरदा बापट यांनी सभेचे सूत्रसंचालन केले.
    सभास्थळी दुपारपासूनच जिल्ह्यातून आलेल्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे आणि रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
    ऐन उन्हातही सभेसाठी आबालवृद्धांसह नागरिकांचा उत्साहवर्धक प्रतिसाद.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news