Dhule News | बापलेकीच्या नात्याला कलंक ! साक्री तालुक्यात पित्याचा पोटच्या 16 वर्षीय मुलीवर बलात्कार | पुढारी

Dhule News | बापलेकीच्या नात्याला कलंक ! साक्री तालुक्यात पित्याचा पोटच्या 16 वर्षीय मुलीवर बलात्कार

पिंपळनेर : (जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा- साक्री तालुक्यातील नागझिरी गावात नातेसंबंधांना काळीमा फासणारी घटना घडली असून त्याठिकाणी नराधम बापानेच आपल्या मुलीवर बलात्कार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. वारंवार होणाऱ्या लैंगिक छळाला वैतागून पीडितेने पोलिसांत धाव घेतल्याने नराधम बाप गजाआड झाला आहे.

नागझिरी येथील 16 वर्षीय पीडितेने पोलिसांना दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की,दोन वर्षांपुर्वी तिच्यावर बापाने बळजबरीने लैंगिक अत्याचार केला.त्यानंतर 19 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता ती घरात एकटी असताना तिला नराधम बापाने तोंड दाबून मक्याच्या शेतात नेले.त्याठिकाणीही त्याने दोन वेळा बळजबरीने संभोग केला. घडलेला प्रकार तिने तिच्या आईला सांगितल्यानंतर या घटनेला वाचा फुटली.

नराधम हा विकृतच !

पीडितेची आई ही पतीपासून विभक्त राहते. मात्र,दोन्ही अपत्ये नराधम बापाकडेच वास्तव्यास होती. हा डाव साधून नराधम पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करत होता. अत्याचार करूनही आपले वाकडे होत नसल्याने त्याची हिम्मत बळावली होती. मात्र, अखेरीस अत्याचाराला कंटाळून मुलीने आपल्या आईकडे जात नराधम बापाची तक्रार केली. मुलीची आपबिती ऐकून तिची आई पूर्णतः हादरली. तिने मुलीला हिम्मत दिली. त्यानंतर दोन्ही माय- लेकींनी निजामपूर पोलिसांना गुदरलेला प्रसंग सांगितला. पोलिसांनी लागलीच अॅक्शन घेत नराधम बापाला गजाआड केले. पीडित मुलीसह व तिच्या आईने दाखविलेल्या हिमतीमुळे मुलीचे संभाव्य शोषण टळले आहे. घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव!

दरम्यान, निजामपूर पोलिसांत या गंभीर गुन्ह्याची तक्रार प्राप्त होताच डीवायएसपी साजन सोनवणे, एपीआय एच.एल. गायकवाड, पीएसआय विशाल पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली. निजामपूर पोलिसांत नराधम बापाविरूद्ध भादंवि कलम 376,376 (2) (एन),376 (क) सह कलम पोक्सो 4,6,8,12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे. पुढील तपास पीएसआय गणेश कोळी करित आहेत.

हेही वाचा –

Back to top button