पंतप्रधान मोदींनी दिलेले शब्द पाळले नाहीत : शरद पवार

शरद पवार
शरद पवार
Published on
Updated on

मोडनिंब : पुढारी वृत्तसेवा: पंतप्रधान मोदींनी दिलेले शब्द पाळलेले नाहीत. फक्त विरोधकांना शिव्या देण्याचे काम ते करीत आहेत. त्यांनी दहा वर्षात काय केले? असा प्रश्न करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदींच्या कारभारावर टीकास्त्र सोडले. महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना निवडून देण्याचे त्यांनी यावेळी आवाहन केले.
माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते – पाटील यांच्या प्रचारार्थ मोडनिंब येथील मार्केट यार्डमध्ये शरद पवार यांची प्रचार सभा आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते.

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील, बळीराम काका साठे अभिजीत पाटील, साईनाथ अभंगराव, कमलताई व्यवहारे, नलिनीताई चंदिले यांच्यासह माढा तालुक्यातील महाविकास आघाडीतील नेते शिवाजी कांबळे, संजय कोकाटे, अॅड. बाळासाहेब पाटील, संजय पाटील घाटणेकर, भारत नाना पाटील आदी उपस्थित होते.

सामान्य माणसांच्या अधिकारांवर संकट येत आहेत. सगळं काम हुकूमशाही पद्धतीने सध्याचे पंतप्रधान करत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे काम चांगले आहे. आरोग्य शिक्षणासह त्यांनी दिल्लीचा विकास करण्यासाठी योगदान दिले आहे. ते सहकार्य करत नाहीत, म्हणून त्यांना तुरुंगात टाकले आहे, अशी अनेक उदाहरणे आहेत. यामुळे लोकशाही वर अन्याय होत आहे.

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, पी. व्ही. नरसिंहराव, मनमोहन सिंह यांचे देशासाठी असणारे योगदान देश विसरू शकत नाही, असे सांगून पवार म्हणाले, "मी अनेक पंतप्रधान पाहिले त्यांचा कारभार पाहिला पण पहिले पंतप्रधान मोदी आहेत की ज्यांच्याकडे देश विचार नाही. देशातील लोकांत संघर्ष ते वाढवतात, सर्वधर्म एकत्र ठेवण्याची जबाबदारी पंतप्रधानांची असते. ती ते पाळत नाहीत.

उत्तम जानकर, माढा तालुक्यातील महाविकास आघाडीचे नेते शिवाजी कांबळे, संजय कोकाटे, मीनलताई साठे, संजय पाटील घाटणेकर, धनंजय डिकोळे तसेच पंढरपूरचे अभिजीत पाटील, साईनाथ अभंगराव, सागर गिड्डे, तळेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील यांच्या आदेशावरून संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघात मी गावोगाव फिरलो. लोकांची मते जाणून घेतली. निष्कर्ष काढला स्वाभिमान टिकवायचा असेल, तर पवारांशिवाय पर्याय नाही, म्हणून मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, असे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले.

2009 पासून सोलापूर जिल्ह्याला कुणी वालीच राहिला नाही. उजनी धरणाचे अनेकजण मालक झाले आहेत. जो तो मालक होतोय आणि अधिकाऱ्यांवर दबाव टाकून पाणी सोडायला लावतोय परिणामी पाण्याचे नियोजन चुकले आहे, असे सांगून मोहिते पाटील म्हणाले की, शेती प्रक्रिया उद्योग सुरू करणे. केळीसाठी संशोधन केंद्र सुरू करणे, प्रत्येक तालुक्यात मिनी एमआयडीसी निर्माण करणे, कुर्डूवाडी येथे रेल्वे वर्कशॉप, उच्च शिक्षण, सिंचन प्रकल्प हे प्रश्न सोडवण्यासाठी माझी उमेदवारी आहे.

मोडनिंब येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेत नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. उन्हाच्या तडाख्यात उकाडा मोठ्या प्रमाणात जाणवत होता. तरी देखील नागरिकांनी पवार यांच्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित दाखवली. संपूर्ण सभेचे सूत्रसंचालन माजी प्राचार्य हरिदास रणदिवे यांनी केले. समाज कल्याण समितीचे माजी सभापती शिवाजी कांबळे यांनी आभार मानले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर शरद पवार यांनी सडकून टीका केली. त्यांनी दिलेला एकही शब्द पाळला नाही. दहा वर्षे काय केले असा सवाल उपस्थित केला. २०१४ सालचे पंतप्रधान मोदी यांनी केलेले भाषण त्यांनी मोबाईल वरून स्पीकर द्वारे सभेला ऐकवले. मोदी फक्त भाषणच करतात काहीही करत नाहीत असे ते म्हणाले. यावेळी उपस्थित नागरिकांनी पवार यांना दाद दिली.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news