विजय करंजकर यांची पुन्हा ‘मातोश्री’कडे पाठ, दुसऱ्यांदा बोलवणे येऊनही भेट टाळली | पुढारी

विजय करंजकर यांची पुन्हा 'मातोश्री'कडे पाठ, दुसऱ्यांदा बोलवणे येऊनही भेट टाळली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या ठाकरे गटाने ऐनवेळी उमेदवारी कापत सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना चाल दिल्याने नाराज असलेले माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी दुसऱ्यांदा ‘मातोश्री’वरून बोलवणे येऊनदेखील पाठ फिरवल्याने चर्चेला उधाण आले आहे. करंजकर शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

नाशिकमधून महाविकास आघाडीतर्फे ठाकरे गटाचे तत्कालीन जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. किंबहुना ठाकरे गटाच्या नेत्यांनी वेळोवेळी सभा, बैठकांतून करंजकर हेच आपले उमेदवार असल्याचे सांगितल्यामुळे करंजकर हे कामाला लागले होते. करंजकर यांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी त्यांचे जिल्हाप्रमुखपदही तत्कालीन महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याकडे सोपविण्यात आले. त्यामुळे करंजकर यांच्या उमेदवारीवर अप्रत्यक्षरीत्या शिक्कामोर्तबच केले गेले होते. परंतु बदलत्या राजकीय परिस्थितीत ठाकरे गटाने करंजकर यांचा पत्ता कट करत नाशिकमधून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे करंजकर कमालीचे व्यथित झाले. ‘निवडणूक लढविणार, आणि पाडणार’ अशी भीष्मप्रतिज्ञा त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत केली होती. त्यामुळे करंजकर यांची मनधरणी केली जाईल, असे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले होते. त्यानुसार करंजकर यांना मुंबईत ‘मातोश्री’वर पाचारण करण्यात आले होते. मात्र, त्यांनी जाण्याचे टाळले. त्यानंतर ते शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू झाल्याने ठाकरे गटात अस्वस्थता पसरली होती. या पार्श्वभूमीवर रविवारी, दि. १४ रोजी त्यांना दुसऱ्यांदा ‘मातोश्री’वर येण्याचे सांगण्यात आले होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव रवि म्हात्रे यांनी भ्रमणध्वनीवर करंजकर यांच्याशी संपर्क साधत त्यांना मातोश्रीवर येऊन भेटण्याचे सूचित केले होते. परंतु करंजकर यांनी मातोश्रीवर जाण्याचे टाळले.

करंजकर शिंदे गटाच्या संपर्कात?

नाशिकच्या जागेवरून महायुतीत अद्यापही संघर्ष सुरू आहे. ही जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळणार, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला की, भाजपला हे अद्याप निश्चित होऊ शकलेले नाही. शिवसेना ठाकरे गटाच्या वाजे यांना टक्कर देण्यासाठी करंजकरदेखील सक्षम उमेदवार असल्याने शिवसेनेच्या शिंदे गटाकडे तिसरा पर्यायदेखील उपलब्ध आहे. करंजकर हे शिंदे गटातील वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याचे समजते.

हेही वाचा –

Back to top button