नव्या टर्मिनलची सुरक्षा भक्कम; विमानतळावर अतिरिक्त सीआयएसएफ कर्मचारी होणार तैनात | पुढारी

नव्या टर्मिनलची सुरक्षा भक्कम; विमानतळावर अतिरिक्त सीआयएसएफ कर्मचारी होणार तैनात

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यात नव्याने उभारण्यात आलेल्या नवीन विमानतळ टर्मिनलचे ‘सुरक्षा कवच’ आता वाढणार असून, हे टर्मिनल सुरू झाल्यावर येथे अतिरिक्त 231 सीआयएसएफचे जवान तैनात केले जाणार आहेत. त्याकरिता पुणे विमानतळ प्रशासन बीसीएएसची (ब्युरो ऑफ सिव्हील एव्हिएशन सेक्युरीटी) अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. अतिशय संवेदनशील भाग म्हणजे विमानतळ. यापूर्वी अनेक विमाने दहशतवाद्यांनी हायजॅक केल्याच्या घटना घडल्या आहेत. तशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी भारत सरकार आणि केंद्रीय हवाई मंत्रालयाकडून प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात विशेष काळजी घेतली जात आहे. त्याकरिता लोहगाव येथील नव्याने उभारण्यात आलेल्या विमानतळ टर्मिनलकरिता आता अतिरिक्त 231 सीआयएसएफचे जवान तैनात केले जाणार आहेत, अशी माहिती पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी दिली.

म्हणूनच नवीन टर्मिनल उद्घाटनानंतरही बंदच…

केंद्र सरकारकडून डीजीसीए (डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हील एव्हिएशन) आणि बीसीएएसच्या (ब्युरो ऑफ सिव्हील एव्हिएशन सेक्युरीटी) अंतर्गत देशातील विमातळाची सुरक्षा केली जात आहेत. याकरिता देशातील प्रत्येक विमानतळावर केंद्रीय सुरक्षा बलाच्या (सीआयएसएफ) जवानांची नेमणूक केली जाते. या सर्वांच्या विशेष तपासणीनंतरच विमानतळावरून विमानोड्डाणांना परवानगी दिली जाते. नवीन विमानतळ टर्मिनलचे उद्घाटन झाल्यानंतरही या महत्वाच्या शासकीय सुरक्षा संस्थांची पुणे विमानतळ प्रशासनाला अद्यापर्यंत परवानगी मिळालेली नाही, त्यामुळे पंतप्रधानांनी उदघाट्न करूनही पुणेकरांना नवीन टर्मिनलमधून प्रवास करता येत नाही. या संदर्भातील कार्यवाही विमानतळ प्रशासनाकडून सुरू आहे, लवकरच सर्व परवानग्या मिळतील.

जुन्या टर्मिनलवर वाढतोय लोड…

पुणे विमानतळावरील प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी, त्याचा परिणाम पुणे विमानतळावरून होणार्‍या प्रवासी वाहतुकीवर होत आहे. प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. एकूणच या टर्मिनलवर दिवसेंदिवस भार वाढत आहे. त्यामुळे नवीन टर्मिनल लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

रेग्युलेटरी बॉडी (बीसीएएस) कडून मिळणार्‍या अंतिम सुरक्षा मंजुरीच्या आणि नवीन टर्मिनलवर सीआयएसएफच्या अतिरिक्त 231 कर्मचार्‍यांची तैनातीची आम्ही प्रतीक्षा करत आहोत. तसेच, फूड अँड बेव्हरेज आणि रिटेल आउटलेट्स स्थापनेसाठी बीसीएएसच्या मंजुरीची प्रतीक्षा करत आहे. नवीन टर्मिनलमध्ये परवानगीशिवाय कोणतेही दुकान उघडता येणार नाही.

– संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ

हेही वाचा

Back to top button