नाशिक जागेसाठी शिवसेनेतच रस्सीखेच, एकापाठोपाठ पदाधिकारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला | पुढारी

नाशिक जागेसाठी शिवसेनेतच रस्सीखेच, एकापाठोपाठ पदाधिकारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महायुतीमध्ये नाशिक लोकसभेचा तिढा वाढत असून, आता उमेदवारीसाठी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांचे नाव समोर आले आहे. बोरस्ते यांना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बोलावणे आल्याने, त्यांनी तत्काळ ठाणे गाठत मुख्यमंत्र्यांची भेट घेत उमेदवारीच्या रेसमध्ये असल्याचे दाखवून दिले. ही बाब सेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना कळताच त्यांनीही पाठोपाठ मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ठाणे गाठल्याने, उमेदवारीवरून सेनेतच जोरदार रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा रंगली आहे.

महायुतीमध्ये नाशिक लोकसभा मतदार संघावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. भाजप, सेना, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी नाशिकच्या जागेवर दावा केल्याने, उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार यावरून कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. आतापर्यंत अनेक नावे चर्चेत आली असली तरी, एकाही नावावर शिक्कामोर्तब केले गेले नसल्याने तिन्ही पक्षात उमेदवारीसाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे. वास्तविक, या मतदार संघात सेनेचे विद्यमान खासदार असल्याने त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी खासदार हेमंत गोडसेंसह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एक, दोन वेळा नव्हे तर तब्बल तीन वेळा मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर शक्तीप्रदर्शन केले. त्यामध्ये पालकमंत्री दादा भुसे, संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, महानगरप्रमुख प्रविण तिदमे यांनी मुख्यमंत्र्यांकडे या जागेसाठी आग्रह केल्याचे दिसून आले. तसेच यासर्व पदाधिकाऱ्यांकडून हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी दिली जावी, अशी जोरदार मागणीही केली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांचे नाव प्रकर्षाने समोर आल्याने, विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचे नाव काहीसे मागे पडत गेले.

हीच संधी साधून शिवसेनेतील काही पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपल्या नावाची लॉबिंग लावण्यास सुरुवात केली आहे. भुजबळ यांचे नाव जाहीर केले जात नसल्याची संधी साधून सेनेतील काही मंडळी खासदार हेमंत गोडसे यांच्या नावाला बाजूला ठेवत स्वत:चे नाव पुढे करताना दिसून येत आहेत. त्यातच जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी शुक्रवारी (दि.१२) मुख्यमंत्र्यांची ठाणे येथे भेट घेतल्याने, शिवसेनेत तिकिटासाठी रस्सीखेच असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, बोरस्ते यांच्या भेटीनंतर लगेचच खासदार गोडसे यांनी ठाणे गाठत मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. अशात तिकिटाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याबाबतची उत्सुकता लागली आहे.

बोरस्तेंना ग्रीन सिग्नल?

शिवसेनेने नाशिक लोकसभा मतदार संघ आपल्याकडे ठेवण्यात यश मिळविल्याची सध्या चर्चा आहे. मात्र, विद्यमान खासदार यांचे तिकिट कापले जाणार असून, त्याऐवजी सेनेच्या एका पदाधिकाऱ्याच्या गळ्यात तिकिटाची माळ टाकली जाणार असल्याची सध्या चर्चा रंगत आहे. त्यातच जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी तडकाफडकी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने, मुख्यमंत्र्यांकडून त्यांना ग्रीन सिग्नल मिळाल्याचे बोलले जात आहे. अर्थात जोपर्यंत अधिकृतपणे नावाची घोषणा होणार नाही, तोपर्यंत ही चर्चाच आहे.

अशी पडली नावे मागे

विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी यापूर्वी तीन वेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेत उमेदवारीसाठी आग्रही मगणी केली. मात्र, त्यांच्या नावाला होत असलेला विरोध बघता, त्यांना कोणताही ठोस शब्द दिला गेला नाही. त्यानंतर राष्ट्रवादीकडून भुजबळांचे नाव पुढे आले. मात्र, त्यांना ब्राह्मण महासंघ, पुरोहित संघ, सकल मराठा समाजाकडून उघडपणे विरोध दर्शविला गेल्याने, त्यांचे नाव वेटींगवर ठेवले गेले. आता अजय बोरस्ते यांचे नाव चर्चेत आले असून, खासदार हेमंत गोडसे यांच्याऐवजी अजय बोरस्ते यांना सेनेकडून चाल दिली जाण्याची शक्यता आहे.

भाजप तिकिटाच्या स्पर्धेतून बाहेर?

नाशिक लोकसभा मतदार संघातील भाजपची ताकद लक्षात घेता, हा मतदार संघ आपल्यालाच सोडला जावा, अशी जोरदार मागणी भाजप पदाधिकाऱ्यांकडून सुरुवातीपासूनच केली जात होती. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत, नाशिकची जागेची मागणी देखील केली होती. मात्र, उमेदवारीसाठी छगन भुजबळ यांचे नाव पुढे आल्यानंतर भाजपची मागणी काहीशी मागे पडताना दिसली. सद्यस्थितीत तिकिटाच्या स्पर्धेतून भाजप पूर्णपणे मागे पडल्याचे चित्र आहे.

हेही वाचा –

Back to top button