Loksabha election 2024 : तरुण मतदारांची नोंदणीकडे पाठ : अल्प प्रतिसाद | पुढारी

Loksabha election 2024 : तरुण मतदारांची नोंदणीकडे पाठ : अल्प प्रतिसाद

पुणे : पुढारी वृत्तसेवा : निवडणूक आयोगाच्या निरीक्षकांनी नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये पुणे जिल्ह्यातील मतदार यादीमध्ये 18 ते 29 वयोगटातील युवा मतदारांची नोंदणी अल्प प्रमाणात आहे, त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये 12 ते 15 एप्रिलदरम्यान युवा मतदार नोंदणी अभियान राबवावे, असे निर्देश विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. अभिजित कुलकर्णी यांनी दिले. डॉ. कुलकर्णी यांनी दिलेल्या निर्देशानुसार, पुणे जिल्ह्यातील (35 बारामती लोकसभा मतदारसंघ वगळून) सर्व महाविद्यालयांमध्ये 12 ते 15 एप्रिलदरम्यान युवा मतदार नोंदणी अभियान राबविण्यात यावे. मतदार नोंदणी अर्ज हे ऑनलाइन स्वरूपात

भरता येणार असून, हे अर्ज   https:/// voters. eci. gov. in  या लिंकवरून भरता येणार आहेत. तसेच वोटर सर्च हेल्पलाईन अ‍ॅपद्वारेदेखील भरता येणार आहेत. मतदार नोंदणीसाठी रहिवासी पुरावा म्हणून लाईट बिल, पाणीपट्टी बिल, आधारकार्ड, बँकेचे किंवा पोस्टाचे पासबुक, भारतीय पारपत्र, नोंदणीकृत विक्रीखत, नोंदणीकृत भाडेकरार, वयाचा पुरावा म्हणून जन्म प्रमाणपत्र, आधारकार्ड, राज्य शिक्षण मंडळाने दिलेले दहावी-बारावीची कागदपत्रे जोडण्यात यावीत.

मतदार नोंदणी अभियानाबाबत महाविद्यालय, परिसंस्थांनी विद्यार्थ्यांना एसएमएस, समाजमाध्यमाद्वारे आणि संकेतस्थळाद्वारे माहिती द्यावी. हा उपक्रम विद्यार्थी, विद्यार्थी कल्याण अधिकारी, संबंधित शैक्षणिक विभाग यासह महाविद्यालय, परिसंस्थातील उर्वरित शैक्षणिक तथा सहशैक्षणिक विभाग, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सामूहिक सहभागातून आयोजित करावा. विशेष मतदार नोंदणी अभियानामध्ये होणार्‍या नवयुवा मतदार नोंदणीचा दैनंदिन अहवाल विद्यापीठास पाठवावा, असेदेखील स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा

Back to top button