Nandurbar politics | नेत्यांच्या पक्षांतराने नंदुरबार जिल्ह्यात महाविकास आघाडीला झटके; राजकीय समीकरणात मोठे बदल | पुढारी

Nandurbar politics | नेत्यांच्या पक्षांतराने नंदुरबार जिल्ह्यात महाविकास आघाडीला झटके; राजकीय समीकरणात मोठे बदल

योगेंद्र जोशी, नंदुरबार

लोकसभा निवडणुका घोषित झालेल्या असतानाच काँग्रेसचे माजी मंत्री अॅड. पद्माकर वळवी यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भारतीय जनता पार्टीत प्रवेश करीत काँग्रेसला धक्का दिला. त्या पाठोपाठ उद्धव ठाकरे शिवसेनेचे विधान परिषद सदस्य आमशा पाडवी यांनीही पक्षांतर करून काल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश घेत उद्धव ठाकरे यांना धक्का दिला. आपल्याच दोन प्रमुख घटक पक्षातून झालेल्या या वजाबाकीमुळे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात महा विकास आघाडीला मोठाच झटका बसला आहे. (Nandurbar politics)

ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या घडामोडी महाविकास आघाडीची राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलवून टाकणाऱ्या असून नंदुरबार लोकसभा मतदारसंघात आणखी काही राजकीय फेरबदल घडण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. या मागची एकंदरीत राजकीय पार्श्वभूमी अशी की, काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून सलगपणे 42 वर्षे म्हणजे 1967 ते 2009 पर्यंत काँग्रेसचे खासदार निवडून येण्याचा विक्रम स्थापित झाला. तथापि मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी काँग्रेसचे ते वर्चस्व मोडून काढल्यामुळे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात 2014 आणि 2019 या दोन्ही पंचवार्षिकला सलगपणे भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या खासदार डॉक्टर हिना गावित जिंकून आल्या. आता सलग तिसऱ्यांदा भाजपाने डॉक्टर हिना गावित यांना उमेदवारी घोषित केली आहे. भाजपाचे वर्चस्व पर्यायाने मंत्री गावित परिवाराचे ते वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठी काँग्रेसने पुन्हा कंबर कसली. त्याचा भाग म्हणून गावित यांचे भाजपातील विरोधक आणि अन्य सर्व पक्षातील विरोधक एकत्र आले आणि भाजपाने डॉक्टर हिना गावित यांना उमेदवारी देऊ नये, उमेदवार बदलवून द्यावा; अशी मागणी लावून धरली. परिणामी मंत्री गावित परिवार एकाकी पडला असून त्यांना प्रचंड विरोध असल्याचे चित्र निर्माण झाले. भाजपा यंदा उमेदवार बदलणार अशी चर्चा त्यांच्या माध्यमातून पसरवण्यात आली. प्रत्यक्षात मात्र भाजपाच्या वरिष्ठांनी पहिली पसंती दर्शवत खासदार डॉक्टर हिना गावित यांनाच उमेदवारी घोषित केली. त्या उलट काँग्रेसचे माजी मंत्री के सी पाडवी निवडणूक लढवण्याची असमर्थता सातत्याने दर्शवत असल्याने महा विकास आघाडीला अद्याप लोकसभा निवडणूक लढवणारा सक्षम उमेदवार मिळालेला नाही. महाविकास आघाडीसाठी हा पहिला झटका बसला. (Nandurbar politics)

दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रचाराला नंदुरबार मधून शुभारंभ करण्याची परंपरा कायम ठेवत स्वतः राहुल गांधी यांच्या उपस्थितीत नंदुरबार येथे आदिवासी न्याय यात्रा काढण्यात आली. परंतु त्याच प्रसंगी मुंबईत काँग्रेसचे माजी मंत्री एडवोकेट पद्माकर वळवी यांनी भाजपात प्रवेश घेतला. नंदुरबार जिल्ह्यातील महाविकास आघाडीला हा दुसरा झटका बसला. त्या पाठोपाठ आता आमशा पाडवी यांनी उद्धव ठाकरे यांच्या सेनेला सोडचिठ्ठी देऊन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. राहुल गांधी यांच्या यात्रेचा एकीकडे मुंबईत समारोप होत असतानाच नंदुरबार जिल्हा महाविकास आघाडीला हा तिसरा झटका बसला. यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील बरीच राजकीय समीकरणे बदलली आहेत.

बदललेल्या समीकरणांचे संभाव्य परिणाम (Nandurbar politics)

नंदुरबार जिल्ह्यातील एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हा नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हे महायुतीमध्ये असून सुद्धा युती धर्म निभवायला राजी नाही. मित्रपक्ष भाजपाच्या उमेदवार खासदार डॉक्टर हिना गावित यांच्यासह गावित परिवाराला असलेला त्यांचा पारंपारिक विरोध त्यांनी जारी ठेवला आहे. मंत्री डॉक्टर गावित यांना अडचणीत आणणारी ही स्थिती राज्यस्तरावर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना अवगत असूनही रघुवंशी यांना ते आवर घालू शकलेले नाही. परंतु अशातच मंत्री डॉक्टर गावित यांना अनुकूल असलेले उद्धव सेनेचे विधान परिषद सदस्य आमशा पाडवी शिंदे गटाच्या नंदुरबार जिल्हा शिवसेनेत प्रवेश घेतला. याला तसले काही संदर्भ असावे का? यावर राजकीय गोटात चर्चा सुरू आहे. इकडे पद्माकर वळवी यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेताच तळोदा शहादा विधानसभेचे भाजपा आमदार राजेश पाडवी यांनी खास कार्यक्रम आयोजित करून त्यांचे स्वागत केले. भाजपाचे राजेश पाडवी आणि काँग्रेसचे पद्माकर वळवी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांना खरोखरचे अनुकूल असल्याचे जाहीरपणे कधी दिसले नाही. ते यापुढे मंत्री डॉक्टर गावित यांना अनुकूल बनतील का? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष आहे. दरम्यान, तळोदा शहादा मतदार संघातून भाजपाचे विद्यमान आमदार राजेश पाडवी यांना पुन्हा उमेदवारी मिळणे भाजपाकडून अपेक्षित आहे. तथापि पद्माकर वळवी हे त्याच भागातून सलग तीन वेळा आमदार म्हणून यापूर्वी निवडून आले आहे; हे लक्षात घेता आता यापुढे पद्माकर वळवी यांना कोणत्या विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी संधी देईल? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. अक्कलकुवा विधानसभेची जागा एकनाथ शिंदे गटाला मिळेल आणि आमशा पाडवी यांना तिथे पुन्हा आमदारकी लढवायला मिळेल; असाही अंदाज व्यक्त केला जातो. तथापि चर्चा आणि अंदाज काहीही असल्या तरी राजकीय समीकरण बदलावणाऱ्या आणखी घडामोडी घडणे बाकी असल्यामुळे तसेच महायुती आणि महाविकास आघाडीच्या वाटाघाटी कोणत्या वळणांनी जातात हेही स्पष्ट होणे बाकी असल्यामुळे आज समोर आलेले कोणतेही राजकीय चित्र खरे मानावे अशी स्थिती नाही.

हेही वाचा –

Back to top button