ठाणे : ठाकुर्लीत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र धुम स्टाईलने लंपास | पुढारी

ठाणे : ठाकुर्लीत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र धुम स्टाईलने लंपास

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : ठाकुर्लीतील ९० फुटी रस्त्यावर फिरायला येणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिने चोरीचे प्रकार सतत वाढत आहेत. शनिवारी (दि.१६) सायंकाळी ९० फुटी रस्त्यावर मैत्रिणीसह फिरण्यासाठी आलेल्या एका महिलेल्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून दोघा लुटारूंनी पळ काढला. याप्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनिता रोहिदास धस (४९, रा. महालक्ष्मी कृपा बिल्डिंग, खंबाळपाडा) या शनिवारी (दि.१६) सायंकाळी त्यांच्या मैत्रिणीसह ठाकुर्लीतील ९० फुटी रस्त्यावर फिरण्यासाठी आल्या होत्या. रस्त्याच्या कडेने गप्पा मारत जात असताना पाठीमागून एका दुचाकीवरून दोन जण आले. दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या लुटारूने सुनीता यांच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसडा मारून हिसकावले. सुनिता यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत दोघांनीही तेथून पळ काढला.

पोलिस चौकीची रहिवाशांकडून मागणी

धुम स्टाईलने चोरीचे प्रकार परिसरात वाढल्याने पादचारी भयभीत झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांनी ९० फुटी रस्त्यावर सकाळ-संध्याकाळ गस्त ठेवली होती. त्यामुळे चोरीचे प्रकार थांबले होते. मात्र पोलिसांची पाठ फिरताच हे प्रकार पुन्हा सुरू झाले आहेत. यातील बहुतांशी लुटारू आणि भुरट्या चोऱ्या करणाऱ्यांना पोलिसांनी यापूर्वी डोंबिवलीतील इंदिरानगर आणि त्रिमूर्तीनगर झोपडपट्टीतून शोधून काढून गजाआड केले आहे. अजूनही चोरीचे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे परिसरात पोलिस चौकी व्हावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

हेही वाचा :

Back to top button