नाशिक: पुढारी वृत्तसेववा- जिल्हा बँकेने बेकायदेशीरपणे शेतकऱ्यांच्या सातबारावरती सोसायटी व बँकेचे नाव लावून शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या एनडीसीसी बँकेने बेकायदेशीरपणे जप्त केलेल्या जमिनी या १५ मार्चच्या शेतकऱ्यांच्या नावावर कराव्यात, अन्यथा प्रशासनाच्या छाताडावर बसून सातबारा सदरी नाव लावण्यात येतील, असा इशारा शरद जोशी विचारमन शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा निमंत्रक विठ्ठल पवार यांनी दिला आहे.
राज्यातील शेतकरी संघटनांच्यावतीने राष्ट्रीय किसान परिषदेचे आयोजन नाशिक येथे करण्यात आले होते. या परिषदेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जबिल मुक्ती तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मान्य करुन घेणे हा आहे. त्यानिमित्ताने आज संघर्ष समितीच्या वतीने परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन विठ्ठल पवार बोलत होते.
पुढे बोलताना पवार यांनी, नाशिक मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांच्या जमिनी परस्पर नावावर करणे हा सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय तसेच राज्याच्या व सहकार कायद्याविरोधात आहे. त्यामुळे त्यांनी हा गुन्हा केलेला असल्याचे सांगितले. यावेळी संघर्ष समितीचे कैलास बोरसे, आदिवासी संघर्ष समितीचे राज्य अध्यक्ष भगवानराव बोराडे, धनंजय पाटील काकडे, दिलीप पाटील, दिलीप गायकवाड, संजय मालोकर, अण्णासाहेब खैरनार, बाळासाहेब वर्पे, दिलीप वर्पे पाटील, धोंडीराम थैल, आनंद शिंदे, जयराम बैरम, अशोक पाटील, अशोक देशमुख आदी शेतकरी उपस्थित होते.
आज मोर्चा
जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी एक वाजता मोर्चा निघणार आहे. जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भगवान बोराडे, कैलास बोरसे यांनी केले आहे.
हेही वाचा :