पुढारी ऑनलाईन : कुणाच्या मनात संभ्रम नको. मराठा समाजाला दिलेले १० टक्के आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंगळवारी विधानसभेत बोलताना दिली. मराठा आरक्षणाला दिलेले आरक्षण कसे टिकणार नाही हे दाखवून द्या, असे आव्हानही त्यांनी विरोधकांना दिले. सरकार म्हणून आम्ही निर्णय घेणारे लोक आहोत. पण एकेरी उल्लेख, खालच्या पातळीची भाषा योग्य नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. जरांगे-पाटील यांच्या तोडून जी भाषा येतेय ती कुणाची आहे? ही व्युहरचना कुणाची? असा सवालही त्यांनी केला.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याबाबत त्यांनी एकेरी शब्द वापरले. जरागेंनी फडणवीस यांच्याबद्दल खालच्या पातळीची भाषा वापरली. कायदा त्यांनी पाळला पाहिजे. कायद्यासमोर कोणीही मोठे नाही. हे करुन टाका. ते करुन टाका. काय ही भाषा? असे कधी झाले नव्हते. पंतप्रधानांबद्दलही त्यांचे उद्गगार चुकीचे आहे. पंतप्रधानांबद्दल अयोग्य भाषा, तुम्हाला शोभतं का? असे सवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगे यांच्याबद्दल बोलताना केले. एसआयटी नेमू. सत्य बाहेर येईल. दूध का दूध पाणी झालेच पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
मराठा समाज संयमी आहे. शिस्तीने वागणारा आहे. पण तरीही आमदारांच्या घराची जाळपोळ, एसटी बसेसची जाळपोळ, दगडफेक केली. याचा अहवाल सरकारकडे असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
मराठा समाजाला दिलेले १० टक्के आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आहे. मराठा समाजाला न्याय कसा मिळेल, अशी सरकारने भूमिका घेतली. सरसकट आरक्षण देता येणार नाही, ते कायद्याच्या कसोटीत टिकणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मराठा समाजाला ओबीसीप्रमाणे सवलती दिल्या आहेत. मराठा समाजाच्या रखडलेल्या नियुक्त्या करण्याचे आदेश मी दिले, असेही त्यांनी नमूद केले. याआधीच मराठा समाजाला आरक्षण देण्याची संधी होती. मराठा समाज मागास आहे हे माहित असून समाजाला वंचित ठेवले. समाजाच्या जिवावर अनेक नेते मोठे झाले. पण कुणी धाडस दाखवले? असा सवाल करत मुख्यमंत्री शिंदे यांनी, आपण खोटे आश्वासन देत नाही. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिल्याचा पुनरुच्चार केला.
दरम्यान, मराठा आंदोलन कार्यकर्ते जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्य प्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुले नार्वेकर यांनी दिले आहेत. या प्रकरणी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी चौकशीची मागणी केली होती.
मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लावण्यासाठी कोणी पैसे दिले?, असा सवाल करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज विधानसभेत मनोज जरांगे-पाटील यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. "मी मराठा समाजसाठी काय केले यासाठी कोणाचाही दाखल्याची गरज नाही. मी काय केले आहे ते सर्वांना माहित आहे. मी नेहमीच वाईटाला वाईटच म्हटले आहे. कधीच चुकीचे समर्थन केलेले नाही, असे स्पष्ट करत आज आपलं राजकारण जातीच्या नावाखाली कोणत्या थराला गेले आहे? आपण समाजाला विघटीत करण्याचे राजकारण करणार असलो तर आपण कोठे चाललो आहोत?" असे सवाल त्यांनी केले.
हे ही वाचा :