मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या आरोपांनंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला. भाजप मराठा समाजाच्या पाठीशी आहे आणि यापुढेही राहणार आहे. यापूर्वीही भाजप सरकारच्या काळात मराठा आरक्षणाचा निर्णय झाला होता आणि तो न्यायालयातही टिकला होता. त्यामुळे पक्ष कायमच मराठा समाजाच्या पाठीशी असल्याचा संदेश आपापल्या मतदारसंघात जाऊन सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.
विधिमंडळाच्या पहिल्या दिवशीच्या कामकाजानंतर भाजप आमदार, पदाधिकार्यांची बैठक झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार आशिष शेलार, प्रवीण दरेकर आदी नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्माण झालेल्या परिस्थितीची चर्चा करण्यात आली. आरक्षणाचा मुद्दा संयमाने हाताळायला हवा, असे सांगतानाच विविध सूचना उपस्थितांना करण्यात आल्या.
यापूर्वीही भाजप सरकारच्या काळात मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय झाला. हा निर्णय उच्च न्यायालयात टिकला. त्यानंतर जे मुख्यमंत्री सत्तेत आले त्यांच्यावर आरक्षण टिकविण्याची जवाबदारी होती. मात्र, ते मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकवू शकले नाहीत. त्यामुळे या सर्व बाबी राज्यातील नागरिकांपर्यंत पोहचविण्याच्या सूचना उपस्थितांना देण्यात आल्या.