Nashik News : डाळिंब उत्पादकांचा ‘तेल्या अन् मर’शी मुकाबला, बागा वाचविण्यासाठी धडपड | पुढारी

Nashik News : डाळिंब उत्पादकांचा 'तेल्या अन् मर'शी मुकाबला, बागा वाचविण्यासाठी धडपड

सटाणा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – शेती करणं म्हणजे शेतकऱ्यांसाठी जुगार ठरतो, असे नेहमीच म्हटले जाते. कधी आसमानी तर कधी सुलतानी अशा वेगवेगळ्या संकटातून शेतकरी जात असतो. काही वेळेला निर्सगाने व बाजारभावाने साथ दिली तर चांगले उत्पन्नही शेतकऱ्याला घेणे शक्य होते. मात्र, काही गोष्टी हातात नसल्याने  शेतकरी संकटात सापडतो. नाशिक जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकरीही अशाच संकटात सापडला आहे. तेल्या व मर रोगापासून डाळिंब बागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष सुरु आहे. राज्यातही बहुंताश डाळिंब उत्पादकांची काहीशी अशीची स्थितीही आहे.

 

नाशिक जिल्ह्यात सटाणा (बागलाण) तालुक्यात डाळिंबाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जातं. गेल्या दोन वर्षापासून मिळत असलेल्या उच्चांकी बाजारभावामुळे तालुक्यात पुन्हा एकदा डाळिंब लागवडीखालील क्षेत्र वाढले आहे. अर्थात तेल्या आणि मर रोगाचे आव्हान अजूनही कायम आहे. मात्र, व्यवस्थापन कौशल्याच्या बळावर  काही शेतकऱ्यांनी या आव्हानावर मात करून दर्जेदार उत्पादन घेण्यात यश मिळविले आहे. 

बागलाण तालुका हा गेल्या काही वर्षांपूर्वी डाळिंब उत्पादनात आघाडीवर होता. परंतु तेल्या आणि मर रोगाचे आक्रमण वाढल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी डाळिंब बागा उपटून फेकल्या. तालुक्यात जवळपास २० हजार हेक्टरपर्यंत होणारी डाळिंब लागवड अवघी ७ ते ८ हजार हेक्टरपर्यंत घसरली. प्रामुख्याने तेल्या आणि मर रोगामुळे उत्पादक अक्षरश: मेटाकुटीला आले. लाखो रुपये खर्च करून अवघ्या रात्रीतून तेल्याच्या आक्रमणामुळे होत्याचे नव्हते झाल्यामुळे शेतकऱ्यांनी अन्य पिकांकडे मोर्चा वळवला. परंतु अलीकडे लागवड कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर डाळिंबाच्या बाजारभावाने विक्रमी उच्चांक गाठल्याचे दिसू लागले. त्यातच पर्जन्यमान कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी पुन्हा एकदा डाळिंब उत्पादनाकडे वळू लागले आहेत. तालुक्यात गेल्या दोन वर्षात डाळिंब लागवडीखालील क्षेत्र वाढले असून सद्यस्थितीत जवळपास १५ हजार हेक्टर क्षेत्रावर डाळिंब उत्पादन घेतले जात आहे.

संकटाशी शेतकऱ्यांचे दोन हात

तेल्या आणि मर रोगामुळे भंडावून गेलेले शेतकरी आपल्या बागा वाचविण्यासाठी धडपड करत असून उत्पादन घेण्यासाठी या संकटाशी दोन हात करीत आहेत. त्याचा लाभ घेत काही बाजारु कंपन्यांकडून औषधांच्या नावाने शेतकऱ्यांची लुटमार होत असल्याचेही दिसते. परंतु तालुक्यातील काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी आपल्या खास व्यवस्थापन कौशल्यातून बागा तेल्या आणि मर रोगमुक्त करण्यात यश मिळवले आहे. अशा काही शेतकऱ्यांकडून यशस्वी डाळिंब उत्पादन घेतले जात असून त्यास चांगला बाजारभावही मिळत आहे. अशा यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथेमुळे अन्य शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळत असून पुन्हा एकदा तालुक्यातील डाळिंब लागवडीचे क्षेत्र वाढू लागले आहे.

बागा वाचविण्यासाठी वाढतोय खर्च

तेल्या आणि मर रोगामुळे तालुक्यातील डाळिंब क्षेत्र खूपच कमी झाले आहे. या रोगांपासून बागा वाचविताना उत्पादन खर्च वाढत आहे. त्या तुलनेत उत्पादन मिळून हाताशी पैसे येत नसल्याने शेतकरी इतर मार्ग निवडत आहेत.- केशव मांडवडे, चौगाव, (माजी संचालक डाळिंब उत्पादक संघ पुणे.)

यशस्वी मुकाबला करतोय

तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर तेल्या आणि मर रोगाचे खडतर आव्हान असले तरी बागेची व्यवस्थित काळजी घेतली आणि व्यवस्थित व्यवस्थापन करून सर्व बाबी वेळच्या वेळी केल्या तर आजही चांगले उत्पादन घेणे मुळीच अशक्य नाही. आम्ही तरी सध्या यशस्वीपणे या रोगांचा मुकाबला करीत आहोत.- जयवंत जाधव, प्रगतिशील डाळिंब उत्पादक बिजोटे.)

हेही वाचा :

Back to top button