Nashik | गोदा आरती करण्याचा अधिकार पुरोहित संघाचाच | पुढारी

Nashik | गोदा आरती करण्याचा अधिकार पुरोहित संघाचाच

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
केवळ निधी लाटण्यासाठी बेकायदेशीर समितीची स्थापना करण्यात आली आहे. परंतु सर्व पाचशे मठ-मंदिरांचा पाठिंबा पुरोहित संघाला आहे. शासनाने मंजूर केलेला निधी रामकुंडाचे सुशोभीकरण करण्यासाठी असून, गोदारतीचा या निधीत काहीही संबंध नाही. १९ फेब्रुवारी रोजी रामकुंडावर पुरोहित संघाशिवाय अन्य कोणत्याही समितीने आरती करण्याचा प्रयत्न केल्यास साधू, संत, महंत यांच्यासह नागरिक हा प्रयत्न हाणून पाडतील, असा ठराव ग्राम सभेत एकमुखाने मंजूर करण्यात आला.

गोदावरी नदी परिसरात असलेल्या लेऊवा पाटीदार कार्यालयात सोमवारी (दि. १२) सायंकाळी ग्राम सभेचे आयोजन करण्यात आले होते. दिगंबर आखाड्याचे श्री महंत रामकिशोरदास शास्त्री महाराज या सभेच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी मंचावर महंत भक्तीचरणदास महाराज, महंत सुधीरदास पुजारी, महंत रामसनेहीदास महाराज, महंत पितांबरदास महाराज, महंत राजारामदास महाराज, महंत संतोकदास महाराज, कैलास मठाचे ब्रह्मचारी महाराज, महंत रामतीर्थ महाराज, बीएपीएस स्वामी नारायण मंदिराचे महाव्रत स्वामी, सोमेश्वरानंद महाराज उपस्थित होते.भक्तीचरणदास महाराज यांनी सांगितले की, साधू संत असो वा पुरोहित संघ असो कोणाच्याही अधिकारावर गदा आणायला नको. गोदा आरतीसाठी जेव्हा समिती बनविण्यात आली तेव्हा स्थानिक साधू संत यामध्ये समावेश करा अशी मागणी करण्यात आली होती. मात्र साधू संत यांना त्यातून डावलण्यात आले असल्याचा आरोप त्यांनी केला. समितीवर बहिष्कार टाकण्याची मागणी महंत रामसनेहीदास महाराज यांनी केली. तर सभेचे अध्यक्ष महंत रामकिशोरदास शास्त्री महाराज यांनी सांगितले की, शासनाने निधी देऊन भांडण लावले आहे. निधीचा दुरुपयोग करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आलेली असली तरी पुरोहित संघाला आमचे समर्थन असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या सभेला माजी आमदार बाळासाहेब सानप, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, सुनील बागुल, रावसाहेब कोशिरे, माजी नगरसेवक लक्ष्मण धोत्रे, भगवान भोगे, मच्छिंद्र सानप, चंद्रशेखर पंचाक्षरी, प्रतीक शुक्ल, कृष्णकुमार नेरकर, उमपती ओझा, गोदाप्रेमी देवांग जानी, अनिल वाघ, रघुनंदन मुठे आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button