शेतात सापडला चांदीच्या नाण्यांचा खजिना | पुढारी

शेतात सापडला चांदीच्या नाण्यांचा खजिना

लंडन : शेतात पिकांच्या रूपाने जणू सोनेच पिकत असते. काळ्या आईच्या कुशीतून येणारी ही पिके माणसाला दोन वेळचा घास भरवत असतात. त्याचे मूल्य कशातही मोजता येण्यासारखे नाही. मात्र, कधी कधी शेतात खरोखरच्या सोन्या- चांदीच्या नाण्यांचा खजिनाही सापडत असतो. आता इंग्लंडमधील एका शेतकर्‍याच्या शेतात असाच प्रकार घडला आहे. हा शेतकरी एका रात्रीत कोट्यधीश बनला आहे.

जुन्या जमान्यात आजच्यासारख्या बँका नव्हत्या व त्यामुळे घरातील सोने, नाणी चोरांपासून लपवून ठेवण्यासाठी किंवा अडचणीच्या वेळी उपयोगाला येतील म्हणून घराच्या भिंतीत किंवा शेतजमिनीतही पुरून ठेवले जात असे. काही वेळा हे धन असेच पिढ्यान्पिढ्या तसेच राहून जाई आणि मूळ मालकाला किंवा त्याच्या वंशजांनाही त्याचा विसर पडे. आधुनिक काळात असे लपवलेले धन अनेक ठिकाणी सापडलेले आहे. आता इंग्लंडच्या इसेक्समध्येही असाच प्रकार घडला आहे.

पाश्चात्त्य देशांमध्ये अनेक हौशी लोक मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने जमिनीतील असे लपलेले धन शोधत असतात. अशाच काही लोकांना या शेतात पुरलेल्या धनाचा छडा लागला. त्या ठिकाणी उत्खनन केल्यावर हा खजिना सापडला. त्यामध्ये 950 वर्षांपूर्वीची चांदीची नाणी सापडली. तिथे तब्बल 144 चांदीची नाणी होती. या नाण्यांचा नंतर लिलाव करण्यात आला. लिलाव करणारा ब्रॅडले हॉपर याने सांगितले की, या नाण्यांच्या मालकाचा मृत्यू युद्धादरम्यान झाला असावा. म्युझियमकडून एकूण 13 नाणी खरेदी करण्यात आली आहेत. या खजिन्यातील 122 नाणी वितळवली जातील. त्यामधील फायदा शेतमालकाला देण्यात येईल. या नाण्यांना 1 कोटी 88 लाख रुपये किंमत मिळण्याचा अंदाज आहे.

Back to top button