स्कॉटलंडमध्ये सापडले उडणार्‍या डायनासोरचे जीवाश्म | पुढारी

स्कॉटलंडमध्ये सापडले उडणार्‍या डायनासोरचे जीवाश्म

लंडन : कोट्यवधी वर्षांपूर्वी या पृथ्वीतलावर डायनासोरचे जणू काही साम्राज्यच होते. डायनासोरच्याही अनेक प्रजाती होत्या. त्यापैकी काही प्रजाती या सध्याच्या पक्ष्यांप्रमाणे आकाशात उडूही शकत होत्या. आता स्कॉटलंडमधील संशोधकांनी अलीकडेच ‘ऑईल ऑफ स्काय’ या परिसरात अशा डायनासोरचे जीवाश्म शोधून काढले आहे. हा ‘टेरोसोर’ मध्य ज्युरासिक काळात म्हणजे 16 कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात होता.

सामान्यपणे पंखासारखी रचना असलेल्या व आकाशात उडू शकणार्‍या डायनासोरचे जीवाश्म हे चीनमध्ये आढळत असतात. स्कॉटलंडमध्ये प्रथमच अशा प्रजातीच्या डायनासोरचे जीवाश्म आढळले आहे. स्कॉटलंड हा डोंगराळ प्रदेश आहे. या भागात डायनासोरच्या सांगाड्याचे काही भाग जीवाश्मामध्ये आढळले आहेत. तसेच त्याचे पंख, पायाच्या भागाचाही समावेश आहे.

संशोधकांनी दावा केला आहे की, ही हाडे ‘टेरोसोर’ प्रजातीची आहेत. ही प्रजाती मगर आणि डायनासोर अशा दोन्हीशी संबंधित आहे. मगरीप्रमाणेच त्यांना मोठी शेपूट असते तसेच मोठे पंखही असतात. हे जीवाश्म चीनमध्ये आढळणार्‍या ‘डार्विनोप्टेरा’ या डायनासोर समूहाशी संबंधित आहेत. चीनमध्ये त्यांचे जीवाश्म सर्वप्रथम आढळले होते. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘जर्नल ऑफ व्हर्टिब्रेट पॅलियोंटोलॉजी’मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रजातीला ‘सियोप्टेरा इवान्से’ असे नाव देण्यात आले आहे.

Back to top button