धुळे मॅरेथॉन सिझन -2 स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद | पुढारी

धुळे मॅरेथॉन सिझन -2 स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे पोलीस दल तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद प्रशासन, महापालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धुळे मॅरेथॉन स्पर्धा 2024 सिझन 2 स्पर्धेला अवघे धुळेकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला.

धुळे जिल्हा पोलीस दल, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, जिल्हा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मॅरेथॉन स्पर्धा-2024 च्या सिझन 2 “फिट धुळे, हिट धुळे” हे घोषवाक्य तर रन फॉर पांझरा ही थीम घेऊन शहरात दुसऱ्यांदा आयोजित करण्यात आली होती. शहरातील पोलीस कवायत मैदान येथून मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली. येथील पोलीस कवायत मैदानावर आज सकाळी धुळे मॅरेथॉनचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झेंडी दाखवून करण्यात आले. याप्रसंगी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, सहायक पोलीस अधिक्षक एस.ऋषीकेश रेड्डी, ब्रँड अंबेसिडर, पोलीस उपअधीक्षक तथा ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, ब्रँड अँबेसिडर आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू संग्राम सिंग, धावपटू श्रीमती कविता राऊत, सिनेतारीका संस्कृती बालगुडे, मृणाल गायकवाड यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, माध्यम प्रतिनिधी, नागरीक व खेळाडू उपस्थित होते.

या स्पर्धेत 21 किलोमीटर, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर, 3 किलोमीटर अशा हाफ मॅरेथॉन, टायमिंग रन, ड्रीम रन, फॅमिली रन चार विभागात आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉन स्पर्धेस पहाटे पाच वाजेपासूनच धुळ्यांच्या नागरीकांनी पोलीस कवायत मैदान येथे गर्दी करण्यास सुरुवात केली होती, पहाटे झुम्बा डान्स, पारंपारिक वाद्यांसह नृत्य सादर करण्यात आले. या मॅरेथॉन स्पर्धेत विविध सामाजिक संस्था, युवक, युवती, महिला, गृहिणी, तरुण, ज्येष्ठ नागरीक तसेच कुटुंबीय मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.

पोलीस कवायत मैदानापासून सुरू झालेली मॅरेथॉन स्पर्धा बारापत्थर मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळयाला वळसा घालुन जुना आग्रा रोड वरुन मोठ्या पुलामार्गे दत्त मंदिर चौक, जिल्हा क्रीडा संकुल, गोंदुर रोड, स्टेडीयम येथुन त्याच मार्गाने पुन्हा पोलीस कवायत मैदान असा मार्ग निश्चित करण्यात आला होता. या मॅरेथॉन स्पर्धेत धुळे जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील स्पर्धकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मॅरेथॉन स्पर्धत विजेत्या प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांकाच्या धावपटूस रोख बक्षिस मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.

हेही वाचा:

Back to top button