Nashik I ठाकरे गटाच्या महाअधिवेशनाची जय्यत तयारी

नाशिक येथे होणाऱ्या शिवसेने(उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या राज्यस्तरीय महाअधिवेशनाची जय्यत तयारी.
नाशिक येथे होणाऱ्या शिवसेने(उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या राज्यस्तरीय महाअधिवेशनाची जय्यत तयारी.
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

१९९५मध्ये नाशकात झालेल्या महाअधिवेशनामुळे शिवसेनेला राज्याची सत्ता मिळाली होती. आता राज्याची सत्ता पुन्हा मिळविण्यासाठी तब्बल २८ वर्षांनंतर मंगळवारी (दि. २३) शिवसेने(उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे नाशिकमध्ये महाअधिवेशन होत आहे. या महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोमवारी (दि. २२) नाशिकमध्ये दाखल होणार असून, अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त ते पंचवटीतील श्रीकाळाराम मंदिरात दर्शन व श्रीरामकुंडावर गोदा आरती करणार आहेत. काळारामाच्या दर्शनापूर्वी ते भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकालाही भेट देऊन अभिवादन करणार आहेत. अधिवेशनाच्या तयारीसाठी खा. संजय राऊत हे शनिवारी (दि. 20) नाशकात दाखल झाले आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने राज्यातील राजकारण तापले आहे. एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या या निवडणुकांसाठी फेब्रुवारीच्या दुसऱ्या सत्रात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी अयोध्येतील श्रीराममंदिरात प्रतिष्ठापना सोहळा होत आहे. या सोहळ्यामुळे देशभरात उत्सवाचे स्वरूप आले आहे. यासठी भाजप केंद्रीय भूमिकेत असल्यामुळे या सोहळ्याचा राजकीय फायदा भाजपलाच होणार हे स्पष्ट आहे. या सोहळ्यापूर्वी राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्त नाशिक दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. त्यामुळे राज्यातील सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी शिवसेनेचा ठाकरे गटही सरसावला आहे. तब्बल २८ वर्षांनंतर नाशिकमध्ये २३ जानेवारीला शिवसेने (ठाकरे गटा)चे राज्यस्तरीय अधिवेशन होत आहे. अधिवेशनाच्या एक दिवसाआधी पंतप्रधान मोदींच्या हस्ते अयोध्येत रामल्लाची प्रतिष्ठापना अयोध्येत होत असल्याने मोदींना 'चेकमेट' देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (दि. २२) श्री काळाराम मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत. तसेच त्यांच्या हस्ते श्रीरामकुंडावर गोदाआरती केली जाणार आहे. ठाकरे यांच्या या दौऱ्याची, किंबहुना अधिवेशनाची जय्यत तयारी केली जात आहे.

खा. संजय राऊत नाशकात दाखल

शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत हे शनिवारीच नाशिकमध्ये दाखल झाले. त्यांनी नाशिकमधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतला. रविवारी (दि.२१) शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार विनायक राऊत, खासदार अरविंद सावंत, युवासेना सचिव वरुण सरदेसाई हेही नाशिकमध्ये येत आहेत. या नेत्यांच्या उपस्थितीत ठाकरे यांचा दौरा व अधिवेशनाची तयारी अंतिम केली जाणार आहे.

यासाठी नाशिकमध्ये होणार अधिवेशन

नाशिक ही प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. या भूमीतच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९९५ साली अधिवेशन घेतले होते. पंचवटीतील आर. पी. विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या शिवसेनेच्या अधिवेशनात 'दार उघड बये दार उघड' असे जगदंबेला साकडे घालण्यात आले होते. त्यानंतर महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता आली होती. त्यानंतर शिवसेनेला सुगीचे दिवस आले होते. आता ठाकरे गटाचा पडता काळ सुरू आहे. राज्यातील सत्ता पुन्हा मिळविण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी राज्यस्तरीय अधिवेशनासाठी पुन्हा नाशिकची निवड केली आहे.

सावरकर स्मारकाला भेट देणार

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अधिवेशनाच्या एक दिवस अगोदर सोमवारी (दि. २२) नाशिकमध्ये दाखल होतील. दुपारी ४ वाजता भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकास भेट देऊन ते अभिवादन करतील. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात दर्शन घेऊन महापूजा करतील. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता रामकुंड येथे गोदाआरती व पुरोहितांचा सत्कार केला जाणार आहे.

असे असेल अधिवेशन

मंगळवारी (दि. २३) सकाळी १० वाजता सातपूर येथील हॉटेल डेमोक्रसी येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून ठाकरे गटाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाला सुरुवात होईल. अधिवेशनानंतर सायंकाळी ६ वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. ठाकरे नाशिकच्या सभेत काय बोलतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news