Ayodhya Ram Mandir Inauguration : हैं राम के वजूद पे हिन्दोस्ताँ को नाज़! | पुढारी

Ayodhya Ram Mandir Inauguration : हैं राम के वजूद पे हिन्दोस्ताँ को नाज़!

चंद्रकांत यादव

प्रसिद्ध ऊर्दू कवी तसेच मूळचे काश्मिरी अल्लामा इक्बाल उपाख्य डॉ. मोहम्मद इक्बाल यांनी मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांवर एक अत्यंत सुंदर नज्म लिहिली होती… श्रीरामांमुळेच भारतीय उपखंडाची प्रतिष्ठा जगभरात आहे, असे त्यातून अधोरेखित होते. (Ayodhya Ram Mandir Inauguration)

मोहम्मद कासीम याने सन 715 मध्ये पहिले आक्रमण सिंधवर केले, तेव्हापासून परकीय आणि देशातील मुख्य सांस्कृतिक प्रवाह हे द्वंद्व सुरू झाले.

पुढे बाबराच्या काळात सन 1528 मध्ये अयोध्येतील राम मंदिराचा विध्वंस झाला. त्यापुढील 500 वर्षांत आजतागायत सुरूच असलेल्या या सांस्कृतिक संघर्षादरम्यान देशाच्या मुख्य सांस्कृतिक प्रवाहाशी ताळमेळ साधण्याचे प्रयत्नही चालत राहिले. डॉ. इक्बाल हेही या प्रयत्नांचे एक प्रतीक आहेत. (Ayodhya Ram Mandir Inauguration)

इस देश में हुए हैं
हज़ारों मलक-सरिश्त,
मशहूर जिन के दम से है
दुनिया में नाम-ए-हिंद
हैं राम के वजूद पे
हिन्दोस्ताँ को नाज़,
अहल-ए-नज़र समझते हैं
इन को इमाम-ए-हिंद

या ‘नज्म-ए-राम’सह ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा’, लिहिणारे इक्बाल उत्तरार्धात अचानक भारतविरोधी बनले. स्वतंत्र पाकिस्तानच्या मागणीचे कट्टर पुरस्कर्ते बनले.

पाकमधील एक मोठा वर्ग मोहम्मद अली जिना यांना नव्हे, तर डॉ. इक्बाल यांनाच देशाचा खरा निर्माता मानतो. उत्तरार्धातील इक्बाल यांचे रूप मुख्य भारतीय प्रवाहाच्या इतके उलट होते की, ‘हैं राम के वजूद पे’ आणि ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा’ याच माणसाने लिहिले असेल, यावर लोकांचा विश्वास बसेना झाला होता.

पुढे लवकरच, इक्बाल स्वत:ही ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा’ विसरले… आणि त्यांनी या मूळ नज्मवर पाणी फिरविणारी नवी नज्म लिहिली… चीन ओ अरब हमारा, हिंदोस्ताँ हमारा, मुस्लिम हैं हम वतन हैं सारा जहाँ हमारा! याउपर त्यांना व त्यांच्या ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा’ला भारतीय विसरले नाहीत. (Ayodhya Ram Mandir Inauguration)

तब्बल 500 वर्षांच्या सहिष्णू सांस्कृतिक संघर्षाचे फलित म्हणून अयोध्येतील राम मंदिरात सोमवारी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होत असताना, इक्बाल यांच्यानंतर आणखी एक काश्मिरी फारुख अब्दुल्ला रामभजन गात आहेत. एरव्ही, काश्मीर विषयावर पाकशी चर्चा करा, अशीच ओरड ते करत असतात. अर्थात ते रामभजन गात आहेत, हे उत्तमच!

इक्बाल हेही काही सौदी अरेबियातून आलेले नव्हते. इक्बाल यांचे पूर्वज काश्मिरी ब्राह्मण होते. सतराव्या शतकात त्यांचे धर्मांतर झाले. इक्बाल आणि गोपाळ कृष्ण गोखल्यांचा वारसा चालविणारे समाजसुधारक सर तेज बहाद्दूर सप्रू एकाच वंशावळीचेे!

राजस्थानातील कुशवाह मुस्लिम, मेवातचे दहंगल मुस्लिम स्वत:ला रामाचे वंशजच म्हणवून घेतात. साधूचे कुळ आणि नदीचे मूळ विचारू नये, असे म्हणतात. खरेतर भारतीयांचेच कुळ आणि मूळ कुणी विचारू नये. ते एकच आहेत! भारतीय प्रवाहाशी जुळवून घेण्याचा प्रयत्नही कुणी करू नये. स्वत:ला त्यात झोकून द्यावे आणि मनसोक्त पोहावे!

 

Back to top button