अयोध्या; वृत्तसंस्था : रामलल्लाची मूर्ती घडविताना छिन्नीवर हातोड्याने केलेला एक वार अरुण योगीराज यांच्या डोळ्यांवर बेतला होता. दगडाचा विलग झालेला तुकडा उडाला आणि थेट डोळ्यात गेला. शस्त्रक्रिया करावी लागली. डॉक्टर म्हणाले, डोळ्यात एक मि.मी. जरी दगडाचा तुकडा इकडे तिकडे गेला असता, तर डोळा गमावण्याची वेळ आली असती, असे डॉक्टरांनी सांगितले तेव्हा अरुण यांना धस्स झाले होते.
संबंधित बातम्या :
कामाबद्दलची अरुण यांची बांधिलकी पाहा… शस्त्रक्रियेनंतरही अरुण मूर्ती बनवत राहिले. लोक डोळ्यात तेल घालून काम पाहतात, ते डोळ्यांत अँटिबायोटिक्स टाकून 10 ते 12 तास सलग काम करत असत. मार हातोडा – जय श्रीराम, सरकव छिन्नी – जय श्रीराम..! सलग काम केले. अनेकदा दिवसातून केवळ दोन तासांची झोप वाट्याला आली. यादरम्यान त्यांचे वजन 10 किलोने कमी झाले. रामलल्ला घडविणे एक तपश्चर्याच होती. अरुण यांचे रामलल्ला सिंहासनावर विराजमान झाले आणि ही तपश्चर्या जणू फळाला आली.
रामलल्लाच्या मूर्तीत बालकाचे निरागस भावही आले पाहिजेत म्हणून दोन हजारांवर बालकांची छायाचित्रे शिल्पकार अरुण योगीराज यांनी न्याहाळली होती. अनेकदा तासन्तास ते बालकांचे भाव न्याहाळत असत. राम मंदिर ट्रस्टने रामलल्लाची मूर्ती साकारण्याबाबतची निविदा जाहीर केली होती. मे महिन्यात अरुण योगीराज दिल्लीला गेले. प्रेझेंटेशन दिले आणि त्यांचीही निवड झाली. अर्थात स्पर्धेत आणखी दोन नामवंत शिल्पकार होते. तिघांना मूर्तीचे काम मिळाले आणि तिन्हींपैकी एका मूर्तीची निवड ट्रस्टचे सदस्य मिळून बहुमताने करतील, असे ठरलेले होते. आपण साकारलेली मूर्तीच सर्वांच्या पसंतीची ठरण्याचे आणखी एक आव्हान होतेच. हे दिव्यही अरुण यांनी पार पाडले.
अरुण हे म्हैसूरच्या वाडियार राजघराण्याचे पिढीजात शिल्पकार आहेत. वडील योगीराज शिल्पी यांच्याच हाताखाली ते तयार झाले.
हेही वाचा :