कोल्हापूर : तळेवाडी येथील क्लासला कंटाळलेल्या 7 विद्यार्थ्यांचे पलायन | पुढारी

कोल्हापूर : तळेवाडी येथील क्लासला कंटाळलेल्या 7 विद्यार्थ्यांचे पलायन

गडहिंग्लज : पुढारी वृत्तसेवा : तळेवाडी (ता. गडहिंग्लज) येथे निवासी असलेल्या खासगी क्लासेसला कंटाळून चक्क 7 विद्यार्थ्यांनी थेट पळून जाण्याचा निर्णय घेत बुधवारी सकाळी क्लासमधून पोबारा केला. एकाचवेळी एवढी मुले क्लासमधून पळून गेल्याने संबंधित शिक्षकासह सर्वांचेच धाबे दणाणले. याबाबत थेट पोलिसांशी संपर्क साधून या मुलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले यांनी तातडीने नेसरी पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक रोहित दिवसे यांना विद्यार्थ्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्याबाबत सूचना दिली.

रोहित दिवसे यांनी तातडीने याबाबत सतर्कता ठेवत आपल्या ठाण्याकडील कर्मचार्‍यांना शोधासाठी रवाना केले. ही सातही मुले अडकूर रोडवरील एका शेतामधून चालत जात असल्याचे दिसल्याने अज्ञात व्यक्तीने फोनवरून कळवले. पोलिस पथकाने त्या ठिकाणी जाऊन मुलांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. यानंतर या मुलांच्या पालकांना बोलावून घेतले.

ही मुले निवासी क्लासमध्ये असल्याने सततच्या क्लासला कंटाळून निघून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. पालकांना याबाबतची माहिती देत मुलांना घरी पाठवून दिले.

वेगवान हालचाली

क्लासला कंटाळून 7 मुले क्लासमधून पळून गेल्याचे समजताच ही मुले अल्पवयीन असल्याने कोणता निर्णय घेतील, ही भीती पोलिसांच्या मनातही होती. त्यामुळे याबाबत वेगवान हालचाली करत पोलिस मुलांपर्यंत पोहोचल्याने त्यांना सुखरूप आणल्याने समाधान व्यक्त होत आहे.

Back to top button