Nashik Leopard Attack : भरदिवसा बिबट्याचा थरार, शेतकऱ्यावर हल्ला

Nashik Leopard Attack : भरदिवसा बिबट्याचा थरार, शेतकऱ्यावर हल्ला

निफाड (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा – येथून जवळच असलेल्या नांदुर्डी गावात शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यावर भर दिवसा बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने या शेतकऱ्याच्या पाळीव कुत्र्याने बिबट्याला पलायन करणे भाग पाडले. नंतर हा बिबट्या जवळच्या नारळाच्या झाडावर चढून बसला होता. शेतकऱ्यांनी आरडा ओरड केल्यानंतर बिबटया मकाच्या शेतात पळून गेला. (Nashik Leopard Attack)

नांदूर्डी येथे घडलेल्या या चित्तथरारक घटनेमुळे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरलेले आहे.
निफाड तालुक्यातील नांदुर्डी शिवारातील अंबादास निवृत्ती खापरे, कैलास नारायण खापरे यांच्या शेतात शुक्रवार (दि. 12) रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास बिबट्याचा हा थरार शेतकऱ्यांनी अनुभवला. सागर खापरे हे मका शेतीला पाणी देत असताना त्यांच्या पाठीमागून बिबट्या हा अतिशय दबक्या पावलाने त्यांच्यावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न होता. मात्र त्यांच्या पाळीव कुत्र्याने बिबट्याला पाहताच, मालकाकडे पाहून भुंकायला सुरुवात केली. कुत्रा भुंकताच सागर खापरे यांनी मागे वळून पाहिल्याने बिबट्याने क्षणात तिथून धूम ठोकली आणि तो जवळच असलेल्या नारळाच्या झाडावर सरसर चढून गेला. तेथून पुन्हा काही क्षणात तो खाली उतरून मक्याच्या शेतात पसार झाला. (Nashik Leopard Attack)

या सर्व प्रकाराने शेतातील काम करत असलेल्या शेतकऱ्यांची गाळणच उडाली होती. केवळ नशीब बलवत्तर म्हणून सागर खापरे या बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले असल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले. दिवसेंदिवस या परिसरात बिबट्याचा उपद्रव वाढत चालला असून वन विभागाने या समस्येची दखल घेवून शेतकऱ्यांना चिंतामुक्त करावे अशी मागणी केली जात आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news