Pune : गोखलेंच्या संस्थेत अध्यक्ष साहूंच्या नौटंकीचा कहर! | पुढारी

Pune : गोखलेंच्या संस्थेत अध्यक्ष साहूंच्या नौटंकीचा कहर!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटीअंतर्गत चालणार्‍या गोखले इन्स्टिट्यूटमध्ये विविध शाखांच्या कारभारात अनेक घोटाळे सुरू आहेत. खुद्द कुलगुरू डॉ. अजित रानडे हे फसवे कुलगुरू म्हणून समाजासह शासनाची दिशाभूल करीत आहेत. तर, अध्यक्ष दामोदर साहू यांनी संस्थेच्या तिजोरीच्या चावीसह आर्थिक व्यवहाराचे अधिकार सचिव मिलिंद देशमुख यांना देऊन टाकले आहेत. साहू यांना सर्वकाही माहीत असून, ते नौटंकीचा कहर करीत असल्याचा आरोप संस्थेतील काही कर्मचारी करीत आहेत. अध्यक्ष दामोदर साहू हे सचिव मिलिंद देशमुख यांच्या तालावर नाचत असून, संस्थेची आर्थिक लूट करून तिच्या सामाजिक व ऐतिहासिक लौकिकास काळिमा फासत आहेत. सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटीची घटना आदर्श असून, त्या घटनेची पायमल्ली होत आहे. स्वत च्या मुलाला संस्थेत घेतल्यानंतर रानडे इन्स्टिट्यूटच्या सोळा एकर जागेच्या घोटाळा प्रकरणात देशमुख यांच्यावर काहीच कारवाई करीत नाहीत.

उलट संस्थेच्या तिजोरीची चावी अन् कोर्‍या धनादेशावर सह्या करून वाट्टेल तसा पैसा खर्च करण्याची मुभा त्यांनी देशमुखांना दिली आहे. दामोदर साहूंचा मुलगा सुधांशू शेखर ऊर्फ बाबू साहूला सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटीचे आजीवन सदस्य करून घेण्यासाठी संस्थेच्या उद्देशाला काळिमा फासला जात आहे. तसेच, विद्यमान अध्यक्ष दामोदर साहू सर्वकाही माहीत असूनही काहीच माहीत नसल्याचे नाटक करीत आहेत. ते इमोशनल ब्लॅकमेलिंग करण्यात पटाईत असून, या नौटंकीचे अनेक पुरावे आहेत, असे कर्मचार्‍यांनी सांगितले.
आरोप करण्याला संस्थेतून काढले जाते दामोदर साहू ओडिशा येथील अनाथाश्रमाच्या नावाने भरभक्कम देणगी मिळवून धार्मिकता पांघरून सरकारी अनुदानसुद्धा लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत. याबाबत बोलणार्‍याला कुठल्याही बाजूचा किंवा कायदेशीर बाबीचा विचार न करता काढून टाकल्याचे प्रकार त्यांच्या अध्यक्षतेखालीच झाले आहेत, असाही आरोप काही कर्मचारी करीत आहेत.

चौकशी करताच साहू ढसाढसा रडले
शासकीय नियमांची पायमल्ली करीत सर्व गैरप्रकार अध्यक्ष दामोदर साहू त्यांच्या हयातीत झाले आहेत. याबाबत विचारणा केली असता ते रडायचे नाटक करतात. पुण्यातील डेक्कन पोलिस स्टेशनमध्ये त्यांना चौकशीला बोलावले असता तिथे ते ढसाढसा रडले व आपली सुटका करवून घेतली. दामोदर साहू हे नैतिक जबाबदारी विसरून सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटी अध्यक्षपदाची गरिमा धुळीस मिळवत आहेत. त्यांच्या कारकिर्दीत सर्वांत जास्त कचेरी तसेच फौजदारी मामले सचिव मिलिंद देशमुख यांच्यावर दाखल झाले आहेत. कारण, दामोदर साहू हे देशमुख यांची पूर्ण पाठराखण करण्यामागे दोघांतील आर्थिक हितसंबंध हे महत्त्वाचे कारण आहे, असा आरोप काही कर्मचारी करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button