

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आगामी लोकसभा निवडणुकीमुळे पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षक ते निरीक्षक दर्जाचे ८० अधिकाऱ्यांची बदली होण्याची शक्यता आहे. स्थानिक रहिवासी व तीन वर्षे सेवा पुर्ण बजावलेल्या अधिकाऱ्यांचा यात समावेश असून त्यांना कार्यकारी पदावरून अकार्यकारी पदावर किंवा परजिल्ह्यात बदली होणार आहे. पोलिस महासंचालक कार्यालयातर्फे संबंधित अधिकाऱ्यांना पसंती क्रम मागवण्यात आला असून त्यानुसार त्यांची नियुक्ती होणार आहे.
लोकसभा निवडणुकीमुळे सर्व शासकीय विभागांमध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे वारे वाहत असून पोलिस दलातही अधिकारी बदलीच्या प्रतिक्षेत आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक ते उपनिरीक्षकांच्या बदलीसंदर्भात यादी तयार होत आहे. यात मूळ नाशिक जिल्ह्यातील रहिवाशी असताना सलग तीन वर्षे शहर आयुक्तालयात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची व कार्यकाळ पुर्ण झालेल्या अधिकाऱ्यांची यादी तयार होत असून महासंचालक कार्यालय तसेच गृह विभागामार्फत लवकरच पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निघण्याची शक्यता आहे. त्यानुसार सुमारे दहा पोलिस निरीक्षक, २७ सहायक निरीक्षक व ४३ उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत.
'प्रभारी' बदलणार
या बदल्यांमध्ये पंचवटी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल शिंदे, म्हसरूळचे राजू पाचोरकर, नियंत्रण कक्षातील तुषार अढावू, इंदिरानगरचे नितीन पगार, नाशिकरोडचे पवन चौधरी, उपनगरचे विजय पगारे आणि बाबासाहेब दुकळे, आडगावचे गणेश न्याहदे, गंगापूरचे श्रीकांत निंबाळकर, सातपूरचे पंकज भालेराव यांच्या बदलीची चर्चा आहे. त्यामुळे यांची बदली झाल्यास नव्याने प्रभारी अधिकारी येणार आहेत. तसेच शहरातील काही पोलिस निरीक्षकांना सहायक आयुक्त किंवा उपविभागीय अधिकारी म्हणून पदोन्नती मिळणार आहे. त्यामुळे पदोन्नती झाल्यास त्यांचीही बदली होणार आहे.