Suchana Seth : मुलाची कस्टडी नवर्‍याला मिळू नये म्हणून ‘त्या’ महिलेचे काळंकृत्य | पुढारी

Suchana Seth : मुलाची कस्टडी नवर्‍याला मिळू नये म्हणून 'त्या' महिलेचे काळंकृत्य

पणजी : प्रभाकर धुरी –  केवळ चार वर्षे वयाच्या पोटच्या मुलाचा निर्घृणपणे खून करणार्‍या सूचना सेठ या निर्दयी मातेला अखेर पोलिसांनी गजाआड केले. (Suchana Seth) गुन्हेगार कितीही हुशार असला, तरी तो कुठला ना कुठला पुरावा मागे सोडतो आणि पोलिसांच्या हाती सापडतो, हेच खरे! मुलाची कस्टडी नवर्‍याला मिळेल, या अनाहुत भीतीपोटी, नवर्‍याला अद्दल घडवण्याच्या ईर्ष्येपोटी आणि नवरा-मुलाची भेट होऊ द्यायची नाही, या आततायी निर्णयापोटी तिने स्वतःच्या मुलाचा बळी घेतला; पण रूम नंबर 404 मध्ये सांडलेल्या रक्ताने पोलिसांना तिच्यापर्यंत नेताच ती गजाआड झाली आणि या खुनाचे रहस्य उलगडले. (Suchana Seth)
या खून प्रकरणातील आरोपी व मूळची पश्चिम बंगालची असलेली सूचना सेठ आणि तिचा पती व्यंकटरमन यांच्यातील घटस्फोटाचे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाने तिच्या नवर्‍याला आठवड्यातून एकदा मुलाला भेटण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे मुलाचा ताबा भविष्यात नवर्‍याकडे जाईल, अशी विनाकारण भीती तिला वाटत होती. त्यामुळे मुलाची व नवर्‍याची होणारी भेट टळावी म्हणून ती मुलासह गोव्यात आली आणि आपल्याच कोवळ्या मुलाचा खून केला. याला ‘माता न तू वैरिणी’ असेच म्हणावे लागेल.
सिकेरी-कळंगुट येथील एका हॉटेलमध्ये ती मुलासह शनिवारी 6 जानेवारीला दुपारी आली आणि सोमवारी सकाळी मुलाशिवाय बाहेर पडली. हॉटेलच्या व्यवस्थापकाला आपल्यासाठी टॅक्सी मागवायला सांगितली. टॅक्सीपेक्षा विमान प्रवास स्वस्त आहे, असे सांगूनही तिने ऐकले नाही. चक्क 30 हजार रुपये भाडे देऊन ती जायला निघाली; पण रूम साफ करायला आलेल्या कर्मचार्‍याला खोलीत रक्ताचे डाग दिसले आणि तपासाची चक्रे फिरली. गोवा पोलिसांनी दूरध्वनीवरून तिच्याकडे मुलाबाबत विचारणा केली; पण मुलाला फातोर्डा येथे मैत्रिणीकडे ठेवल्याचे खोटेच सांगून तिने वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. आपले म्हणणे खरे वाटावे म्हणून तिने मैत्रिणीचा बनावट पत्ताही दिला; पण पोलिसांच्या चौकशीत तो बनावट निघाला. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी टॅक्सीचालकाशी संपर्क साधत त्याला जवळच्या पोलिस ठाण्यामध्ये टॅक्सी न्यायला सांगितले. चित्रदुर्ग पोलिस ठाण्यात तिच्याकडील बॅगांची तपासणी करताच एका बॅगेत कोंबलेला मुलाचा मृतदेह सापडला.

मुलाचा मृत्यू श्वास कोंडल्याने

हरिहुर (कर्नाटक) येथील फॉरेन्सिक तज्ज्ञ डॉ. कुमार नाईक यांनी मुलाच्या मृतदेहाचे विच्छेदन केले. मुलाच्या अंगावर ओरखड्याच्या, झटापटीच्या खुणा नाहीत, मुलाचा मृत्यू गळा दाबल्याने श्वास कोंडून झाल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला. मुलाच्या चेहरा व छातीला सूज होती. नाकातून रक्तस्राव झाला होता; शिवाय मृत्यू 36 तासांपूर्वी झाला होता, अशी माहिती दिली.

कोण आहे सूचना सेठ?

सूचना सेठ इंटेलिजन्स एथिक्स एक्स्पर्ट व डेटा वैज्ञानिक आहे. ती माईंडफुल लॅब या बंगळूर येथील एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्सची संस्थापिका आणि संचालक आहे. ती रामकृष्ण मिशनमधून संस्कृत भाषेत प्रथम आली आहे. तिला 4 भाषा बोलता येतात. 2008 मध्ये तिने भौतिकशास्त्रात पदवी घेतली आहे. 2021 मध्ये एआय एथिक्समध्ये 100 प्रतिभाशाली महिलांच्या यादीत तिचे नाव होते. हार्वर्ड विद्यापीठाच्या बर्कमन क्लाईन रिसर्च सेंटरमध्ये तिने शिक्षण घेतले. स्टार्टअप आणि उद्योग संशोधन प्रयोगशाळेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) अध्यायनातील समस्यांवर तोडगा काढणारी कंपनी तिने बंगळूरमध्ये स्थापन केली. तिच्याकडे आर्टिफिशियल लँग्वेज, मशिन लर्निंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग व टेक्स्ट मेलिंग या क्षेत्रात 4 अमेरिकन पेटंटस् आहेत. तिचे लग्न 2010 मध्ये झाले, तर मुलाचा जन्म 2019 मध्ये झाला. त्यानंतर 2020 मध्ये त्यांच्यात वादाला सुरुवात होऊन घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाली.

Back to top button