

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बळकटीसाठी जे पदाधिकारी काम करतील त्यांना बढती दिली जाईल. मात्र निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना तात्काळ घरचा रस्ता दाखविला जाईल, अशी सक्त ताकीद भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना दिली आहे. अयोध्येतील राममंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या परिसरातील प्रत्येक मंदिर स्वच्छ करावे, उद्घाटन सोहळ्याचा दिवस दिवाळी साजरी करावी, अशा सूचना देखील बावनकुळे यांनी दिला.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, मंत्री गिरीष महाजन, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, प्रदेश कार्यालय प्रभारी तथा उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे, स्थानिक लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पंचवटीतील स्वामी नारायण बँक्वेट हॉलमध्ये भाजपच्या नाशिक, दिंडोरी, शिर्डी, अहमदनगर येथील लोकसभा कोअर कमिटी बैठक मंगळवारी(दि.९) पार पडली. यानंतर नाशिक लोकसभा व दिंडोरी लोकसभेतील १२ विधानसभेच्या सुपर बुथ वॉरियर्स संवाद बैठक लंडन पॅलेस हॉल येथे पार पडली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आमदार अॅड.राहुल ढिकले, प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, लक्ष्मण सावजी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत बावनकुळे यांनी आगामी लोकसभा निवडणूक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १२ जानेवारीचा नाशिक दौरा तसेच येत्या २२ जानेवारीला होणाऱ्या अयोध्येतील राममंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व सुपर बुथ वॉरीअर्सना मार्गदर्शन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षात केंद्र व राज्यातील सत्तारूढ भाजपच्या माध्यमातून झालेली जनहिताची कामे लोकांपर्यंत पाहोचवावीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे विकासाची गॅरंटी याबाबत जनजागृती करावी. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक बुथ सक्षमीकरण करणे, मोदींच्या नाशिक दौऱ्यांतर्गत होणाऱ्या रोड शो यशस्वी करण्यासाठी कामाला लागा, अयोध्या येथे राम मंदिर बांधण्याबाबत दिलेल्या आश्वासनाची पूर्ती केल्याबद्दल विविध कार्यक्रमांची आखणी करून महाउत्सवात सहभागी करून घ्यावी, आदी सूचना यावेळी बावनकुळे यांनी दिल्या.
प्रत्येक मंदिर स्वच्छ करा
येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने प्रत्येक घरात दिवाळी साजरी होईल, यादृष्टीने कामाला लागा. यासाठी १४ ते २१ या दरम्यान जनजागरण करा. आपल्या घराजवळील प्रत्येक मंदिर स्वच्छ करण्याचा संकल्प करा, असे आवाहन बावनकुळे यांनी केले.
हेही वाचा :