Nashik News : ग्रामविकास अधिकाऱ्याचे दिव्यांग प्रमाणपत्र निघालं बनावट | पुढारी

Nashik News : ग्रामविकास अधिकाऱ्याचे दिव्यांग प्रमाणपत्र निघालं बनावट

घोटी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; नाशिक जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास अधिकाऱ्याकडे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र असल्याची माहिती मुंबईतील सर ज. जी. समूह रुग्णालयाकडून उघड झाली आहे. खोटे स्टॅम्प व बोगस दस्त प्रकरणी या ग्रामविकास अधिकाऱ्यावर कार्यवाहीबाबत विशेष शिफारस केली आहे. यामुळे पुणे, नगर नंतर नाशिकमध्येही बनावट प्रमाणपत्राचा सुळसुळाट अखेर उघडकीस आला आहे.

सर ज. जी. समूह रुग्णालय मुंबई यांनी संजय भावसिंग पाटील यांना कोणत्याही प्रकारचा दृष्टिदोष नसल्याचे शून्य टक्के प्रमाणपत्र ३ जुलै २०१८ रोजी जावक क्र. ८६५/२०१८ दिले होते. त्यावर पाटील यांनी बनावट ४० टक्के कायमस्वरूपी दृष्टिदोष प्रमाणपत्रावर बनावट शिक्का व सही केल्याचे पत्र सर ज. जी. समूह रुग्णालयाने आरती दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष व गटविकास अधिकारी पंचायत समिती दिंडोरी, जि. नाशिक यांना देत तत्काळ कार्यवाहीची शिफारस केली आहे. पाटील यांची बनावट दिव्यांग प्रमाणपत्राची करामत पुढे आल्यावर ८ डिसेंबर २०२३ रोजी ऑनलाइन अर्ज करताना माझ्याकडे कोणतेही दिव्यांग प्रमाणपत्र नसल्याचे नमूद करून प्रशासनाची अधिक दिशाभूल केली आहे.

पाटील यांचे २ नोव्हेंबर २०२३ रोजी बदली आदेश देताना जिल्हा परिषदेने दिव्यांग प्रमाणपत्रांची तपासणी व पडताळणी केली नाही. कायमस्वरूपी पदस्थापना नसताना त्यांना त्वरित त्याच दिवशी वरिष्ठांच्या आदेशाने कार्यमुक्त करून त्यांना माळेगाव, ता. सिन्नर येथील कार्यभार त्वरित देण्याबाबत सूचना दिली. यात विशेष म्हणजे पाटील यांना माळेगाव ग्रामपंचायतीचा कार्यभार त्वरित हस्तांतरित झाला. परंतु त्यांनी लखमापूर, ता. दिंडोरी येथील कार्यभार हस्तांतरित केला किंवा नाही याची साधी दखलसुद्धा जिल्हा प्रशासनाने घेतली नाही. यामुळे बदलीप्रक्रिया राबवताना आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार आरती दिव्यांग सेवाभावी संस्था लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करणार आहे. आरती दिव्यांग सेवाभावी संस्थेने या प्रकरणात ग्रामपंचायत विभागास पत्र देत प्रमाणपत्र पाहणीची मागणी केली असता गोपनीयतेच्या नावाखाली माहिती देणे सोयीस्करपणे टाळले गेले. यामुळे संस्थेने सर ज. जी. समूह रुग्णालयाकडे धाव घेत हा प्रकार उघडकीस आणला.

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनविणे मुळात गंभीर व गुन्हेगारी स्वरूपाची बाब असून, त्यांनी शासनाची दिशाभूल व खऱ्या दिव्यांग बांधवांवर अन्याय केला आहे. एक मोहरा टिपला असला तरी अजून काही संशयित शिल्लक आहेत. संजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होईपर्यंत संस्था लढा सुरूच ठेवेल.
– गोपाळ शिंदे, अध्यक्ष, आरती दिव्यांग सेवाभावी संस्था

हेही वाचा :

 

Back to top button