PhD Exam : पीएच. डी. परीक्षा फेब्रुवारीत ; व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मान्यता | पुढारी

PhD Exam : पीएच. डी. परीक्षा फेब्रुवारीत ; व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मान्यता

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पीएच.डी.प्रवेशची वाट पाहणार्‍या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली असून, येत्या फेब्रुवारी महिन्यात पीएच.डी.प्रवेश पूर्व परीक्षा घेण्याच्या निर्णयास शनिवारी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यामुळे पुणे,अहमदनगर व नाशिक जिल्ह्यांतील संशोधन केंद्रात विद्यार्थ्यांना पीएच.डी.प्रवेशाची संधी लवकरच प्राप्त होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी व्यवस्थापन परिषदेची बैठक घेण्यात आली. या बैठकीस विद्यापीठचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ.विजय खरे, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र विखे-पाटील, डॉ. देविदास वायदंडे, डी.बी. पवार, सागर वैद्य, बागेश्री मंठाळकर आदी उपस्थित होते. विद्यापीठाची पीएच.डी प्रवेश प्रक्रिया केव्हा सुरू होणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती. मात्र, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नवीन नियमावलीनुसार पीएच.डी.प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी आवश्यक तयारी केली जात होती. यापुढील काळात ज्या ठिकाणी रिसर्च सेंटर आहे, त्याचा ठिकाणच्या रिसर्च गाईडला पीएच.डी.साठी विद्यार्थी घेता येणार आहेत. त्यामुळे पुढील काळात पीएच.प्रवेशाच्या जागा काही प्रमाणात कमी होणार आहेत.

विद्यापीठातर्फे नोव्हेंबर 2022 मध्ये पीएच.डी. प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यानंतर वर्षभरानंतर प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. विद्यापीठातर्फे पीएच.डी.प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश पूर्व परीक्षा येत्या फेब्रुवारी महिनाअखेरीस होण्याची शक्यता आहे. तसेच जानेवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात याबाबत जाहिरात प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागवले जाण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी एक महिन्यांचा कालावधी दिला जाणार आहे. त्यामुळे पीएच.डी.साठी प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना तयारीसाठी आता कमी कालावधी उरला आहे.

Back to top button