Nashik News : वादग्रस्त बीओटी प्रकल्पाला पुन्हा चाल, प्राधान्यक्रम डावलून भूसंपादनाचा घाट

Nashik News : वादग्रस्त बीओटी प्रकल्पाला पुन्हा चाल, प्राधान्यक्रम डावलून भूसंपादनाचा घाट
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– सल्लागार नियुक्तीवरून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या बीओटी प्रकल्पाला महापालिकेने पुन्हा एकदा चाल दिली आहे. शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या महापालिकेच्या सहा मिळकती बीओटी तत्त्वावर विकसित करण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. या प्रस्तावाच्या माध्यमातून प्राधान्यक्रम डावलून गंगापूर रोडवरील मॅग्नम हॉस्पिटलजवळील एका आरक्षणासह वडाळा रोडवरील हॉस्पिटलच्या जागेशी संबंधित आरक्षण संपादनाचा घाट घातला जात असल्याने बीओटी प्रकल्प पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे आहेत.

भाजपच्या गत सत्ताकाळात महापालिकेच्या उत्पन्नवाढीच्या उद्देशाने बीओटी प्रकल्पाचा प्रस्ताव पुढे आला होता. शहरातील महात्मा फुले मार्केट, बी. डी. भालेकर हायस्कूल, भद्रकाली मार्केटसह ११ मिळकती बीओटी तत्त्वावर विकसित करण्याची योजना होती. या प्रकल्पासाठी विनानिविदा 'कमलेश कन्सल्टंट अँड देवरे – धामणे आर्किटेक्ट' या सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्यात आल्याने वाद उभा राहिला होता. या सल्लागाराने शहरातील काही बड्या विकासकांशी संगनमत करत मोक्याचे भूखंड, मिळकती या विकासकांच्या ताब्यात देण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे आरोप झाल्याने हा प्रकल्पच अडचणीत सापडला. त्यामुळे तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांनी सल्लागार नियुक्तीसाठी नवीन निविदा काढली. मात्र त्यातही आरोपांचे सत्र कायम राहिल्याने पवार याच्या बदलीनंतर आयुक्तपदी रुजू झालेल्या डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी या प्रकल्पालाच ब्रेक लावला. त्यानंतर आता विद्यमान आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी या वादग्रस्त प्रस्तावाला पुन्हा एकदा चाल दिली आहे. नुकत्याच झालेल्या बीओटी समितीच्या बैठकीमध्ये सहा भूखंडांना केंद्रस्थानी ठेवून बीओटी प्रकल्पाला चाल देण्यासंदर्भात आढावा घेण्यात आला. त्यामध्ये गंगापूर रोड तसेच वडाळा भागातील भूखंड विकसित करताना येथील आरक्षण संपादन करण्याची शिफारस केल्यामुळे बीओटी प्रकल्पाभोवती पुन्हा एकदा संशयाचे धुके गडद होऊ लागले आहे.

असा असेल विकसन करारनामा

बीओटी प्रकल्पांतर्गत संबंधित विकासकाला बीओटीवर मिळकत विकसित करण्यासाठी देताना ३० वर्षे मुदतीचा करार केला जाईल. पहिल्या दहा वर्षांकरिता जागा लीजवर व त्यानंतर पुढील २० वर्षांची मुदतवाढ दिली जाईल. यात रेडीरेकनरनुसार तळमजल्यावरील वाणिज्य वापर दर आणि वरील मजल्यावरील वाणिज्य वापराचे दर भिन्न असणार आहेत.

भूसंपादनाच्या घाईमुळे संशय

बीओटी प्रस्तावांतर्गत मॅग्नम हॉस्पिटलजवळील बारा हजार चौरस मीटर जागेपैकी महापालिकेच्या ताब्यात ५२०० चौरस मीटरचे दोन भूखंड आहेत. मात्र, या ठिकाणी १७०० चौरस मीटर जागेचे संपादन बाकी असल्याचे कारण देत संपूर्ण बारा हजार चौरस मीटर जागा बीओटीवर विकासासाठी स्वतंत्र निविदेचा प्रस्ताव सुचविण्यात आला आहे. मात्र, उर्वरित जागेचे संपादन त्वरित करण्याची शिफारस करण्यात आल्याने संशय निर्माण झाला आहे.

भालेकर शाळा इमारतीत पूर्व कार्यालय

बी. डी. भालेकर शाळा बंद पडल्यानंतर आता या मिळकतीचा बीओटीवर विकास केला जाणार असून, याठिकाणी पूर्व विभागीय कार्यालयाचे स्थलांतर केले जाणार आहे. देवळाली गावातील महात्मा गांधी टाउन हॉल, सातपूर येथील मनपा कार्यालय व टाउन हॉल ही जागादेखील बीओटीवर विकसित केली जाणार आहे. गंगापूर रोडवरील आकाशवाणी टॉवरजवळील जागा महापालिकेच्या ताब्यात असल्यामुळे यापूर्वीच काढलेली निविदा कायदेशीर सल्ला घेऊन अंतिम करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news